मुंबई - काँग्रेस व भाजपच्या सराकरने हिरानंदानी बिल्डर प्रकरणात लक्ष घातले नाही. मात्र आपण, हिरानंदानी बिल्डरने पचवलेले दोन हजार फ्लॅट बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
ईशान्य मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांची प्रचार सभा विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर येथील संभाजी मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले.
आंबेडकर म्हणाले, हीरानंदनी बिल्डरच्या विरोधात मोर्चे काढले, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने फ्लॅट देण्यास सांगितले, पण पुढे काय झाले माहीत नाही. त्यावेळेस काँग्रेसचे सरकार होते त्यांनी काही केले नाही. आता भाजपचे सरकारही काही करत नाही. वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्याशिवाय आपणाला न्याय मिळणार नाही. काँग्रेस, भाजप हे बिल्डरचे बगलबच्चे आहेत. मोक्याची जागा घ्यायची तिला व्यवसायिक स्वरूप देऊन विकासकाला आंदण द्यायचे हा उद्योग त्यांनी चालू केला आहे.