मुंबई - पालिकेच्यावतीने शहरामध्ये नवीन रस्ते करणे, अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि पावसाळ्यानंतर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. केवळ रस्ते आणि फुटपाथवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करुन देखील मुंबईकरांच्या नशिबी रस्त्यांची प्रचंड दुर्दशाच येत आहे. गेल्या काही वर्षांत शहरामध्ये पहिल्या पावसानंतर बहुतेक सर्व रस्ते खड्डेमय होत असून याचा भुर्दंड मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.
मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. थोड्याशा पावसाने बहुतेक सर्वच रस्त्यांवर पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरील पाण्यामधून वाहने चालवावी लागत आहेत. शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांत शहरातील वाहतूक प्रचंड मंदावली असून सकाळ आणि संध्याकाळ संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी होत आहे.
महापालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करुन देखील मुंबईककरांना रस्त्यांच्या चांगल्या दर्जांच्या सुविधा मिळणे कठिण झाले आहे. मोठा गाजावाजा करत कोल्ड मिक्स या पद्धतीने पालिका खड्डे बुजवते, असा दिखावा करुन पालिका खड्डे बुजवण्याचे कॉन्ट्रॅक्ट देते. मात्र, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रस्त्यावर खड्डे पडले आहेतच. त्यावरुन पालिकेचा कोल्ड मिक्स खड्डे बुजवण्याचा दाव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. सध्या मुंबईत पावसामुळे पुढील ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे सायन माटुंगा, दादर, कोळीवाडा आणि वडाळा, अशा अनेक ठिकाणच्या रस्त्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र आहे.