मुंबई - महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Reshuffle) फेरबदल होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून तीन पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये एकमेकांबाबत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. सर्व नाराजी पाहता पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार (Mahavikas Aghadi Meeting) असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत गृहमंत्रीपदाचा आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
मुख्यमंत्री-गृहमंत्री भेट चर्चेत - नुकतेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. गृहमंत्र्यांवर शिवसेनेचे नेते नाराज असल्यामुळे ही भेट घेतली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. गृहमंत्री भाजपच्या नेत्यांबाबत नरमाईने वागत असल्याचा सूर शिवसेना नेत्यांचा होता. त्यामुळे गृहमंत्री पद शिवसेनेकडे देण्यात यावे अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नसून, सर्व काही सुरळीत असल्याचे या भेटीनंतर गृहमंत्र्यांनी सांगितले होते.
पुढील आठवड्यात महाविकास आघाडी नेत्यांची बैठक - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तांत्रिक बाजू आणि त्यात असलेली राज्यपालांची भूमिका, यामुळे विधानसभा अध्यक्षपद अजूनही काँग्रेसपासून दूरच आहे. याबाबतची काँग्रेसच्या गोटात नाराजी आहे. ही सर्व नाराजी पाहता पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत गृहमंत्रीपदाचा आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गृहमंत्रीपद-विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा - तसेच या पदांबाबत खांदेपालट होऊन गृहमंत्रीपद काँग्रेसकडे तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले जाऊ शकते का? याची देखील चाचपणी होण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये खांदेपालट होण्याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात होत असली तरी, यासंबंधी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आघाडी सरकारमधील ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.