मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्याचे नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र सत्तापक्षातील नेत्यांमध्येच यावरून मतभेद असल्याचे दिसून येत आहे. सत्तापक्षातील अनेक नेत्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. तर विरोधी पक्षातील नेतेही लॉकडाऊन केला जाऊ नये या भूमिकेत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनच्या मुद्द्याला राजकीय रंग चढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कठोर निर्बंधांची गरज व्यक्त केली जात आहे.
टास्क फोर्सकडून लॉकडाऊनच्या सूचना
कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन लावावा असा केंद्रासह राज्याच्या टास्क फोर्स समितीचा दबाव आहे. टास्क फोर्सची यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. यात समितीने राज्य सरकारला लॉकडाऊनसंदर्भात सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले. तसेच धान्य पुरवठा, औषधे, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधांचे नियोजन करण्याचे आदेशही मुख्य सचिवांना दिले. मात्र लॉकडाऊनला आता सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही विरोध केला जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
लॉकडाऊन हा पर्याय नाही - नवाब मलिक लॉकडाऊन हा पर्याय नाही - नवाब मलिक
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार होत आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे असे नवाब मलिक यांनी सांगितले. लॉकडाऊन राज्याला परवडणार नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी अजून काळजी घेतली पाहिजे. नियम पाळल्यास कोरोना वाढणार नाही, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनवर मतभेद नाही - टोपे
लॉकडाऊनवरून कुठलेही मतभेद नाहीत. लॉकडाऊन कुणालाही नको आहे. मुख्यमंत्र्यांचीही लॉकडाऊन करावा, अशी इच्छा नाही. महाराष्ट्रात कोणत्याही व्यक्तीला लॉकडाऊन नको आहे. तहान लागल्यावर विहीर खणायची अशी म्हण आहे. आपण तशी तयारी करत आहोत. ती तयारी कशी आहे? त्यावर लक्ष ठेवून आहोत असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. त्याचा विचार करायला हरकत नाही. मात्र गेल्या वेळेसारखा लॉकडाऊन परवडणारा नाही, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊनला विरोध नाही - जयंत पाटील
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र आमचा लॉकडाऊनला विरोध नसल्याचे म्हटले आहे. आमचा लॉकडाऊनला विरोध नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण करून भाजपने आमच्यात भांडणे लावू नये अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
पुन्हा लॉकडाऊन नकोच - निरुपम पुन्हा लॉकडाऊन नकोच - निरुपमकाँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. मुंबईत पुन्हा लॉकडाऊन नको. गेल्यावेळी लॉकडाऊन झाल्याने राज्याची आर्थिक स्थिती ढासळली होती. लोक त्रस्त झाले होते. गावाकडे पलायन करण्याची लोकांवर वेळ आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करण्यात येऊ नये, असे आवाहन निरुपम यांनी आघाडी सरकारला केले आहे.
लॉकडाऊन शेवटचा उपाय - मुश्रीफ
लॉकडाऊन हा शेवटचा उपाय आहे. अशी संख्या वाढत गेली तर संक्रमणाला आळा घालण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनला विरोध करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना आम्ही समजावून सांगू. ते आमच्या जिल्ह्यातील आहेत, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.
लॉकडाऊनला आमचा विरोध - चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. राज्याला आता लॉकडाऊन परवडणार नाही. तुम्ही निर्बंध कडक करा, हरकत नाही. पण लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही आणि आम्ही त्याला कडाडून विरोध करू, असे पाटील म्हणाले. तसेच लॉकडाऊन लावण्याआधी असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत करावी, त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडू नये, असंही ते म्हणाले. प्रत्येक झोपडीत काही ना काही उद्योग चालत असतो. तो बंद झाला तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. राज्यात एक कोटी असंघटीत कामगार आहे. गेल्या वेळी त्यांना काहीच पॅकेज दिलं नाही. यावेळीही त्यांना पॅकेज देणार नाही आणि घरी बसा म्हणून सांगणार हे चालणार नाही. आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पॅकेज देण्याची मागणीही त्यांनी केली.
लॉकडाऊन परवडणार नाही - पडळकर
लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. कोणतेही उपाय करायचे नाही. मात्र लॉकडाऊन करायचा, हे योग्य नाही. लॉकडाऊन हा उपाय नाही, असे सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मधल्या काळात सरकारला वारंवार पत्र लिहून चाचण्या कमी करू नका असे सांगितल्याचे पडळकर म्हणाले. चाचण्या वाढविण्याची विनंती केली. मात्र, या सरकारने मधल्या काळात चाचण्याच बंद करून टाकल्या. त्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे. नियोजनाच्या अभावामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचे पडळकर म्हणाले.
लॉकडाऊनला भाजपचा विरोध - अतुल भातखळकर
सरकार लॉकडाऊनची नुसती वाच्यता करत नाही, तर हे सरकार गोरगरीब सर्वसामान्य जनतेला इशारा देण्याचे काम करत अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टी या संपूर्ण लॉकडाऊनचा विरोध करत आहे. गेल्या मार्च महिन्याच्या आणि आताच्या मार्च महिन्यात मूलभूत फरक आहे. गेल्या वेळेला आपल्याकडे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर नव्हत. डॉक्टरांना हे माहिती नव्हतं की, यावर उपाय कसे करायचे. या सर्व गोष्टी आता उपलब्ध आहेत. त्यामुळे लॉकडाऊनबाबत विचार करता कामा नये. उलट टेस्टिंग, आयसोलेशन आणि ट्रेसिंग ही त्रिसूत्री सरकारने पाळलीच पाहिजे. सर्वसामान्यांच्या पोटावर पाय मारण्याचं काम सरकारने केले, तर ते भारतीय जनता पार्टीकडून कदापि सहन केले जाणार नाही असेही ते म्हणाले.
मूर्खपणा केला तर लोक रस्त्यावर उतरतील - संदीप देशपांडे
मूर्खपणा केला तर लोक रस्त्यावर उतरतील - संदीप देशपांडे
मनसेनेही लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचं नुकसान होणार आहे. ते सरकार भरून देणार आहे का? आम्हाला बारमधून तीन लाख रुपये हप्ता येत नाही, असा टोला मनसेचे महासचिव संदीप देशपांडे यांनी लगावला. साधी सर्दी झाली आणि टेस्ट केलं तरी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो. या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या. लोकं आता लॉकडाऊन मानायला तयार नाहीत. हा मूर्खपणा किंवा आततायीपणा केल्यास लोकं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
तर आम्ही रस्त्यावर उतरू - इम्तियाज जलील
लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबादमध्ये 8 तारखेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. पण उद्योग सुरू होणार आहेत. त्यात लाखो कामगार आहेत. मग त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? की केवळ उद्योग लॉबीला खूष करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - मोदींसह या नेत्यांनी केली पवारांच्या प्रकृतीची विचारपूस, पवार ट्विटरवर झाले व्यक्त