मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने नोटीस बजावली आहे. या नोटिसीनंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन 'आ देखे जरा किसमे कितना है दम..' असे म्हणत भाजपा नेत्यांना आणि मोदी सरकाराल चॅलेंज दिले होते. त्यानंतर, आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी भाजपवर जहरी टीका केली. तसेच, 'मै नंगा आदमी हूँ, बाळासाहेब ठाकरें का शिवसैनिक हूँ... मी कुणाला घाबरत नाही', अशा शब्दात भाजपला इशारा दिला आहे.
ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला भाजप कार्यालयाचा बॅनर -
मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयाबाहेर काही शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालयाचा बॅनर झळकवला आहे. त्यानंतर त्वरित पोलीस बॅनर उतरवण्यासाठी आले असता त्यांना त्या शिवसैनिकांनी बॅनर उतरवण्याबाबत कारवाई महापालिका करेल असे म्हणाले. मात्र, तरीदेखील पोलिसांनी हा बॅनर उतरवला आहे. त्यामुळे ईडी नोटीशीवरून राजकीय घमासान सुरु झाल्याचे दिसत आहे. या बॅनर्सचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे
राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट
संजय राऊत यांनी आज सायंकाळच्या सुमारास वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांची ईडीच्या नोटिसीबाबत चर्चा झाल्याची माहिती शिवसेना सूत्रांकडून देण्यात आली.
भाजपच्या माकडांना सगळी माहिती मिळते कुठून - राऊत
गेल्या दीड महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) आमच्याकडून माहिती, कागदपत्रं मागितली आहेत. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत. ईडीनं अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. मग भारतीय जनता पक्षाच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली, ते कालपासून उड्या कसे काय मारू लागले, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
२२ आमदारांचे राजीनामे घेऊन सरकार पाडण्याचे प्रयत्न - संजय राऊत
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. भाजपच्या या हस्तकांनी मला 22 आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावे होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगण्यात आले आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
..पण मीही त्यांचा बाप आहे -
राऊत म्हणाले, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि काही हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. सरकारच्या मोहात पडू नका. आम्ही सरकार पाडण्याची पूर्ण तयारी केली आहे, असे सांगत ते मला धमकावत आहेत. आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, अशी धमकीही मला दिली जात आहे. पण मीही त्यांचा बाप आहे, असेही राऊत म्हणाले.
केंद्र सरकारकडून तपास संस्थांचा गैरवापर नाही - देवेंद्र फडणवीस
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर काँग्रेसच्या काळात जास्त झाला. भाजप अशा संस्थांचा वापर राजकारणासाठी करत नाही. ईडी आधी पुरावे गोळा करते त्यानंतर संबंधिताला नोटीस बजावली जाते व मग चौकशी केली जाते. यामध्ये सूडबुद्धीचे राजकारण कोठे आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
असं घाणेरडं राजकारण कधी पाहिलं नाही - अनिल देशमुख
महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. भाजप नेत्याच्या किंवा त्यांच्या धोरणाच्या विरोधात जो कुणी बोलेल त्याच्या मागे ईडीची किंवा सीबीआयची चौकशी लावली जाते. सीबीआयच्या बाबतीत तर आम्ही आता निर्णय घेतलाय की, आमच्या परवानगीशिवाय सीबीआयला कोणत्याही व्यक्तीची चौकशी करता येणार नाही. मात्र, ईडीचा जो अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे व त्याचा असा राजकारणासाठी वापर करणं हे महाराष्ट्रात कधी पाहिलं गेलं नाही, असे अनिल देशमुख म्हणाले.
आम्ही याविरोधात लढत राहू - आदित्य ठाकरे
या प्रकरणावर बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे राजकीय असल्याचे म्हटले. महाविकास आघाडी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. आम्ही याविरोधात लढा देत राहू, असे ते म्हणाले.
हुकूमशाही लादण्याचा भाजपचा प्रयत्न - अशोक चव्हाण
ईडी प्रकरण राजकीय हेतूने केल्याचा आरोप कामगार मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. ईडी आणि सीबीआय यांच्यामार्फत राजकीय हेतू साध्य करण्यात येत आहे. या संस्थांचा वापर करून स्वत:ची हुकूमशाही लादण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
संबंध असो किंवा नसो तरीही ईडीची नोटीस - पटेल
आजकाल देशभरात कोणत्याही व्यक्तीला ईडीच्या नोटीसा जात आहेत. यामध्ये कोणतेही आश्चर्य वाटण्यासारखी परिस्थिती राहिली नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले. एखाद्या व्यक्तीचा संबंध असो, नसो तरीही ईडीची नोटीस मिळत असल्याचे पटेल यांनी सांगितले.
हम भी कुछ कम नही - रामदास आठवले
ईडीची (सक्त वसुली संचनालय) नोटीस आल्यानंतर संजय राऊंत यांनी 'आ देखे जरा किसमे कितना दम', असे ट्वीट केले होते. त्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवी अंदाजात 'हम भी दिखायेंगे हम भी नही कुछ कम', असे उत्तर दिले आहे.
ईडी कारवाई म्हणजे सूडबुद्धीचे राजकारण - सतेज पाटील
चुकीच्या आणि सूडबुद्धीच्या मार्गाने काही गोष्टी सुरू आहेत. संस्था टिकल्या पाहिजेत कारण सत्ता आज कोणाची आहे आणि उद्या कोणाची हे माहित नसतं. राजकीय हेतूने प्रेरित काम करता कामा नये, अशी दक्षता घेण्याची गरज आहे. मात्र दुर्दैवाने ते दिसत नाही. कारण राजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्णय होत आहेत, अशी शंका येत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
इतका गोंधळ करायची गरज काय- किरीट सोमैया
पीएमसी बँक पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने ईडी असो व इतर तपास यंत्रणा तपास करत आहेत. एचडीएलएचे काही पैसे वेगवेगळ्या लोकांचा खात्यात पैसे गेले आहेत, त्याचा तपास सध्या सुरू आहे. जर ईडीला आणि आम्हाला माहीत पडलं आहे, त्यानुसार एचडीआयएलचा पैसा प्रवीण राऊत यांच्या द्वारे माधुरी राऊत यांच्या खात्यात वळवला व नंतर तो पैसा वर्षा संजय राऊत यांच्या खात्यात आला आहे. त्यामुळे ईडी जर चौकशी करत असेल, नोटीस पाठवत असेल, तर संजय राऊत यांनी इतका गोंधळ करायची गरज काय आहे. पैसे चोरीचे आहेत हिशोब द्यावाच लागेल असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
ही शिवसेनेची दुटप्पी वृत्ती - राम कदम
एकीकडे कोणाचे घर तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकार पोलिसांचा वापर करते आणि एखाद्याला जबरदस्तीने अटक करते, तर दुसरीकडे केंद्रीय एजन्सी नोटीस देत आहे आणि चौकशीत सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे, तर मग यात सूडबुद्धी कोणती? ही शिवसेनेची दुटप्पी वृत्ती आहे" असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.
अंदाज खरा ठरला - सचिन सावंत
तर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी 4 डिसेंबर रोजी " यथा मोदी तथा फडणवीस दोघांनाही पराभव स्विकारण्याची खिलाडूवृत्ती नाही. गिरे तो भी टांग उपर - अशीच त्यांची भूमिका असते! आता ईडी सारख्या यंत्रणेला चवताळून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सोडले जाईल. इन्कमटॅक्सच्या नोटिसांचे प्रिंटींग जोरात सुरू होईल." असे ट्विट केले होते. या ट्विटवर ट्विट करत "हा अंदाज खरा ठरत आहे" असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे. आपण 4 डिसेंबर रोजी वर्तवलेला अंदाज आज खरा ठरत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
राऊत एवढी बडबड करतात, मग जाऊ देना ईडीच्या समोर - नारायण राणे
भाजप नेते नारायण राणे, यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठविलेल्या नोटिशीचे समर्थन केले आहे. राणे म्हणाले, “संजय राऊत एवढी बडबड करतात, मग जाऊदे ना त्यांना ईडीच्या समोर. पुरावे असल्याशिवाय ईडी आणि सीबीआय चौकशी करत नाही. पुरावा लागतो. तेव्हाच ते नोटीस पाठवतात आणि तपास करतात,” अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला
..हे म्हणजे लोकशाहीचा खून- यशोमती ठाकूर
भाजपच्या विरोधात जे कोणी बोलते त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात येत आहे. त्यामुळे ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून होत असल्याची टीका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. ज्या भाजपच्या लोकांच्या बँक खात्यामध्ये अवैधरित्या पैसे जमा झालेत त्यांच्यावर ईडी चौकशी का लागत नाही, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.