मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi In Punjab ) यांच्या पंजाब सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत गंभीर चूक आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पंतप्रधान हुसैनीवाला येथे जाण्यास निघाल्यानंतर शहीद स्मारकाच्या सुमारे 30 किलोमीटर अलीकडे 10 ते 15 मिनीटे त्यांचा ताफा थांबवावा लागला होता. त्यावरुन भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. यावर आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik On PM Security Breach ) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून राजकारण ( Bjp Congress Politics On PM Security Breach ) केलं जातं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय तसेच राज्यातील पोलिसांची असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
नवाब मलिक यांनी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक नेमकी का झाली ? याचा खुलासा होणे गरजेचे आहे. केंद्रीय अथवा राज्य सरकारच्या तपास यंत्रणेकडून याचा तपास झाला. तर, एकमेकांवर आरोप केले जातील. त्यामुळे या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशां मार्फत स्वतंत्रपणे केला गेला पाहिजे."
तसेच, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीनंतर भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. यामुळे सुरक्षेत चूक कशी झाली? हे लोकांसमोर येणे गरजचे असून, याबाबत नीपक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे मतही मलिक यांनी व्यक्त केले."
काय घडले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन होणार होते. त्यासाठी ते पंजाबात दाखल झाले होते. मात्र, अचानक दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान माघारी परतले. पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांनी दौरा रद्द केल्याचे प्रथम सांगण्यात आले होते. पण, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबात स्पष्टीकरण देण्यात आले.
पंतप्रधान हुसैनीवाला येथे जाण्यास निघाल्यावर एका उड्डाणपुलाजवळ १५ ते २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा एकाच ठिकाणी थांबून होता. निर्दशकांनी येथे रस्ता रोखल्याचे आढळून आले. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर बाब समोर आल्यानंतर तिथून तातडीने बठिंडा येथे परतण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, गृहमंत्रालयाने नमूद केले.
हेही वाचा - PM Security Breach : सुरक्षेत चूक झाल्याचे कारण देत पंतप्रधानांची फिरोजपूरमधील सभा रद्द