मुंबई : रेमडेसिवीरच्या पुरवठ्यात भाजपच्या कथित हस्तक्षेपावरून गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या मोठे वादंग सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बघायला मिळत आहेत.
ब्रुक्स फार्मावरील कारवाईनंतर भाजप आक्रमक
रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या दमणमधील ब्रुक्स फार्मा कंपनीकडे इंजेक्शनच्या 60 हजार कुप्यांचा साठा असून कंपनीचे मालक राजेश डोकनिया हे त्याची निर्यात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना शनिवारी मिळाली होती. यानंतर पोलिसांनी राजेश डोकनियांना विले पार्ले पोलीस ठाण्यात ताब्यात घेत त्यांची सुमारे 45 मिनीटे चौकशी केली. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासाठी राज्यातील भाजपचे नेते कंपनीच्या संपर्कात होते. यानंतर राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार पराग अलवानी, आमदार प्रसाद लाड यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात जात डोकनियांच्या चौकशीवरून पोलिसांशी हुज्जत घातली.
गुजरातमध्ये भाजपकडून रेमडेसिवीरचे मोफत वाटप
कोरोनावरील उपचारात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रेमडेसिवीरचा सरकारी यंत्रणेमार्फतच पुरवठा होणे अपेक्षित आहे. अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा असताना भाजपकडून वाटपासाठी या औषधाची खरेदी करण्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या गुजरातमधील एका कार्यालयात रेमडेसिवीरचे मोफत वाटप झाल्याचे समोर आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही नागपूर शहरासाठी सन फार्माकडून दहा हजार रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले होते. भारतातील ब्रुक फार्मा ही कंपनी रेमडेसिवीरची मोठी निर्यातदार कंपनी आहे. जगभरात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना कंपनीकडे रेमडेसिवीरची मागणी सध्या वाढली आहे.
फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका
देवेंद्र फडणवीसांनी या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरच टीका केली आहे. आपण सर्वजण कोरोना संकटाचा सामना करत असताना सरकार अशा लाजीरवाण्या कृतीत मग्न आहे. ब्रुक फार्माच्या मालकांना त्यांनी ताब्यात घेतले. कंपनीने महाराष्ट्र सरकार आणि दमण प्रशासनाकडून सर्व त्या परवानग्या घेतलेल्या होत्या. एवढेच नव्हे तर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनीही हे औषध महाराष्ट्राला देण्यास कंपनीला सांगितले होते. मात्र राज्य सरकार अत्यंत हीन पातळीचे राजकारण करीत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.
रेमडेसिवीरची साठेबाजी बेकायदेशीर
रेमडेसिवीर हे आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी परवानगी मिळालेले औषध आहे. त्यामुळे त्याची कुणीही विक्री करू शकत नाही. तसेच याचा साठा करणे बेकायदैशीर तसेच अनैतिक असल्याचे दिल्ली मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अरूण गुप्ता यांनी म्हटले आहे.
दिलीप वळसे पाटलांचा इशारा
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधताना भाजपने पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाकडून केली जाणारी अशी कृती खपवून घेतली जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
प्रियंका गांधींचीही टीका
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनीही यावरून भाजपवर टीका केली आहे. रेमडेसिवीरसाठी लोक दारोदार भटकत असताना जबाबदारीच्या पदावर असणारी व्यक्ती अशा मानवताविरोधी कृती करत असल्याचे पाहून आश्चर्य वाटते असे त्यांनी म्हटले आहे.
प्रियंका चतुर्वेदींची टीका
अशा प्रकारचे राजकारण करणे ही महाराष्ट्राच्या जनतेशी प्रतारणा नाही तर दुसरे काय आहे? विरोधी पक्षाचा नेता आणीबाणीसाठीच्या औषधाचा साठा हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो आणि याविषयी चौकशी करणाऱ्या पोलिसांशीच हुज्जत घालतो. हे निंदनीय आहे. फडणवीस यांना याची लाज वाटली पाहिजे अशी टीका शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.
मलिक यांचा भाजपवर निशाणा
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गुजरातच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे पत्र ट्विट करत गुजरातला महाराष्ट्रापेक्षा जास्त रेमडेसिवीरचा पुरवठा केला जात असल्याचा दावा केला होता. केंद्र सरकार राज्याशी सापत्न वागणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. केंद्र सरकारकडून औषध कंपन्यांना महाराष्ट्राला इंजेक्शन दिले जाऊ नये म्हणून परवाने रद्द करण्याची भीती दाखवली जात असल्याचेही मलिक यांनी म्हटले होते. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही यावरून भाजपवर टीका केली होती.
पीयूष गोयल यांची राज्य सरकारवर टीका
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करत ठाकरे सरकारकडून या मुद्द्यावरून केले जात असलेले राजकारण लज्जास्पद असल्याची टीका केली होती. तर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्याला पुरेशा प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजन पुरविण्याविषयी आश्वस्त केल्याचे म्हटले होते.