मुंबई - कोरोनाच्या जागतिक संकटाशी गेली दोन वर्षे सगळे जग लढत आहे. याला आपणही अपवाद नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात या महाभयंकर संकटाने गंभीर परिणाम केलेले आहेत. बऱ्याच जणांना आपले जवळचे कायमचे गमवावे लागले आहेत. बरीच मुले अनाथ झाली आहेत. अनाथ मुलांचा विचार केला तर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा चेहरा नजरेसमोर येतो. अनाथांची माय असलेला हा वटवृक्ष काही दिवसापूर्वीच उन्मळून पडला. अशा प्रसंगी या वटवृक्षाच्या सावलीने प्रेरित होऊन काहीजण अनाथांचा नाथ होण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक अनाथांचा नाथ बनला आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत व सध्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मंत्री उदय सामंत यांच्याकडे अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेला राहुल वाघमोडे.
कोण आहे राहुल वाघमोडे?
राहुल वाघमोडे हा शेतकरी कुटुंबातील असून तो पोलीस दलात कार्यरत आहे. सध्या तो उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे त्यांच्या अंगरक्षकाचे काम करत आहे. राहुलला फार पूर्वीपासून वाटायचे की आपले जगणे हे दुसऱ्यासाठी असायला हवे. विशेष करून जेव्हा एखादा अनाथ मुलगा, मुलगी रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर, ब्रिजखाली जाताना त्याच्याकडे काही खाऊ मागायचे किंवा पैसे मागायचे, तेव्हा राहुलचा जीव कासावीस व्हायचा. तो आस्थने त्यांची, त्यांच्या कुटुंबाची माहिती घ्यायचा. त्यांच्याविषयी त्याच्या अंतकरणातून आवाज यायचा. खरोखर अशा लोकांसाठी आपण जगले पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे आणि त्याचबरोबर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा चेहरा त्यांच्या नजरेसमोर यायचा. याच सर्वविचाराने प्रेरित होऊन राहुल ने सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात नातेपूते येथे अनया संवर्धन फाउंडेशन नावाने एक अनाथालय सुरू केले आहे. या १ जानेवारी २०२२ पासून त्याची सुरुवात करण्यात आली. यामध्ये अनाथ बेवारस मुल- मुली, कोविडमध्ये मृत्यू पावलेल्या पालकांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले इत्यादी प्रकारची मुले-मुली आहेत.
'पोलीस म्हणून विविध अनुभव'
राहुल म्हणतो, ज्यावेळी, मी स्वतःला हा प्रश्न विचारतो की राहुल तू काय करतोयस..? मी माझ्या आत डोकावून शांतपणे विचार केल्यास लक्षात येते की, आपण आपल्यात कोणतीही नकारात्मकता नाही. आपण या संघर्षशील काळात स्वतःच असणं गमावत नसून नव्या जोमाने आपली सामाजिक बांधिलकी जपत कार्यशील आहोत. कोविडमध्ये
लाखो लोकांनी यादरम्यान आपल्या आप्तस्वकीयांना गमावलं आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असणारे सैनिक, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्वच घटकांनी कोरोनारूपी संकटाशी दोन हात करीत आपल्या प्राणाची आहुती देत नागरिकांच्या जगण्यासाठी हौतात्म्य पत्करले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्यापरीने कार्यरत असतो. प्रत्येक जण आपली स्वतःची एक भूमिका घेऊन एक समाजशील प्राणी म्हणून जगत असतो. मी माझं संपूर्ण आयुष्य समाजाच्या भल्यासाठी व्यतित करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. या अनुभवाच्या शिदोरीतून एक गोष्ट लक्षात आली की, आपण कोणत्यातरी विधायक कामामध्ये आपल्याला गुंतवून घेतले पाहिजे. या विचाराने मी माझी सामाजिक बांधिलकी जपत अनाथाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कसा भागतो अनाथालयाचा खर्च?
राहुल सांगतो १२ वर्षे पोलीस दलात सेवा करत असताना माझ्या पगारातील काही भाग या अनाथ मुलांवर मी खर्च करतो. भविष्यात वृद्धाश्रम सुद्धा सुरू करण्याचा माझा मानस आहे. मी स्पर्धा परीक्षा व्याख्यानाच्या माध्यमातून तरुणांसाठी मार्गदर्शन करत असतो, अशा लोकांना माझ्या या अनाथालया विषयी माहिती झाली आहे. तेव्हा ते सुद्धा फुल ना फुलाची पाकळी म्हणून धान्य, कपडे, विविध वस्तू स्वतः इथे येऊन देत असतात. त्यातूनही माझा खर्च भागण्यास थोडी मदत होते. मला विश्वास आहे की मी सिंधुताई सपकाळ यांचा वारसा नक्की चालवेन. उद्याचा महाराष्ट्र उद्याचा भारत नक्की घडवेन. आज भारत देशातल्या, महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींमध्ये उद्याचा भारत घडवण्याची ताकद आहे. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितल आहे, की उद्याचा भारत जागतिक महासत्ता बनवायचा असेल तर तरुणांना चांगले विचार, त्यांच्या हातांना काम दिले पाहिजे. व मला माहित आहे मी एक युवक आहे मला हे करायचे आहे, कारण मी भारताचा तरुण जवान आहे व मी हे नक्की करणार असेही राहुल म्हणतो.
राहुलबद्दल काय बोलले मंत्री उदय सामंत?
राहुल हा माझा अंगरक्षक असला तरी विविध सामाजिक कार्यातून तो लोकांसाठी मदत करत असतो. स्वतःच्या तालुक्यात त्यांनी असे विविध उपक्रम सुरू केले आहेत. तो स्पर्धा परीक्षांना व्याख्यान सुद्धा देत असतो. पोलीस दलाची जबाबदारी संभाळून अशा पद्धतीने समाज सुधारण्यासाठी समाज उपयोगी काम तो करतो आणि म्हणून त्याला मदत केली पाहिजे. त्याला राजाश्रय दिला पाहिजे अशा मताचा मी आहे. त्याचं मानसिक बल वाढवणे यासाठी सुद्धा मी प्रयत्न करतो. पोलीस दलात राहून अनाथांसाठी अनाथालय सुरू करणारा राहुल हा पहिला व्यक्ती असेल. भविष्यात त्याचे कार्य इतकं मोठ होईल की तो माझा अंगरक्षक आहे, असं म्हणण्यापेक्षा त्याच्यासोबत मी असतो, असे लोक म्हणायला सुरुवात करतील, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.