मुंबई - मुंबई एल टी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना एका व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी यापूर्वी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. गुरुवारी रात्री एलटी मार्ग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यापूर्वी याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले होते.
माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेल्या आदेशानंतर याप्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्याकडे चौकशी देण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तावार्ता पथकाला वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने अटक केली होती.
दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात असलेल्या अंगाडीया यांना आयकर विभागाची भीती दाखवून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलिस निरीक्षक कदम आणि पोलिस उपनिरीक्षक जमदाडे यांनी बेकायदेशीररित्या अटकाव करून त्यांची पोलीस ठाण्यात कुठेही नोंद न करता त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात येत होती. या दोघांसह गुन्हे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात गेले होते. पण त्यांचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. अखेर त्यांना याप्रकरणी गुरूवारी रात्री आठच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.