मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहे. फेसबुकच्याद्वारे मुंबईकरांची संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने मुंबईकरांना तणावमुक्तीसाठी संडे स्ट्रीट अनुभव देखील घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) संजय पांडे यांनी मुंबईकरांशी संवाद साधताना आता नवीन घोषणा केली आहे. मुंबई पोलिसांसाठी आता कपडे आणि वस्तू तयार करण्यात येणार आहेत. या वस्तूंची विक्री करून मिळणारे पैसे मुंबई पोलीस कल्याण निधीसाठी वापरा जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांकडून टी शर्ट, टोपी, कप, स्वेटर, ट्रकसूट, परफ्यूम, पाणी बॉटल यासारख्या विविध वस्तू बनवण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांकडून बनवण्यात येणाऱ्या या वस्तू शोरूममध्ये विकल्या जातील. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे पैसे पोलिसांच्या कल्याण निधीसाठी वापरला जाईल, अशी माहिती संजय पांडे यांनी फेसबुकवरून संवाद साधताना दिली आहे. आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून आजपासून मुंबईकरांसाठी संडे स्ट्रीट सुरू करण्यात आले आहे.
मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकाराने मुंबईत सहा ठिकाणी हे संडे स्ट्रीट सुरू करण्यात आले आहेत. मुंबईकरांना रस्त्यावर येवून मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलींग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत यासाठी संडे स्ट्रीट ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 10 वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन ते नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. आज संजय पांडे यांनी मरीन ड्राइव्ह या ठिकाणी या संडे स्ट्रीटमध्ये सहभाग घेतला आणि दौड केली. मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या प्रमाणत मुंबईच्या विविध भागातून नागरिक दाखल झाले होते. कोणी या मोकळ्या रस्त्यावर बॅडमिंटन खेळत होते, कोणी सायकलींग करीत होते, तर कोणी स्केटिंग आणि योगा करीत होते. या संकल्पनेचे मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्याचबरोबर मुंबईच्या विविध भागात ही संडेस्ट्रीट तयार करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - Suspicious Transactions : यशवंत जाधवांनी 'मातोश्री'ला दिले 2 कोटी 60 लाख? आयकरने जप्त केलेल्या डायरीत उल्लेख