मुंबई : अनलॉकमध्ये हॉटेल आणि बार सुरू करण्यात आले असले, तरी त्यांवर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. यामध्ये जाणाऱ्या लोकांना फिजिकल डिस्टन्सिंगसारख्या कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांना अनेक ठिकाणी धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील ड्रॅगनफ्लाय पबमध्येही असाच प्रकार समोर आला, ज्यानंतर पोलिसांनी पबवर धाड टाकत ३४ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ पब सुरू ठेवल्यामुळे, तसेच पबमध्येही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यावेळी ज्या ३४ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये काही मोठ्या सेलिब्रिटींचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.
सुरेश रैनावरही गुन्हा दाखल; एएनआयची माहिती..
या कारवाईदरम्यान भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
व्हिडिओ व्हायरल..
यासोबतच या कारवाईनंतरचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पबबाहेरचा असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आली नाही.
हेही वाचा : शिक्षणमंत्री बच्चू कडू यांना मुंबईला जाण्यापासून रोखले; वरिष्ठांच्या आदेशावरुन कारवाई?