मुंबई - रस्त्याच्या बाजूस उभ्या असलेल्या महागड्या मोटारसायकल चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडण्यात पार्क साईट पोलिसांना यश आले आहे. या तिघांनी विक्रोळी, घाटकोपर, साकीनाका, व पवई आदी भागातून अनेक मोटारसायकल चोरल्याचे उघडकीस आले असून त्यापैकी 11 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून मोटारसायकल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
रस्त्याच्या बाजूस उभ्या असलेल्या महागड्या मोटारसायकल चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडण्यात पार्क साईट पोलिसांना यश आले आहे. संबंधित कारवाईत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे पोलिसांनी त्याला पालकांच्या स्वाधीन केले आहे. मुंबई शहरात मोटारसायकल चोरीच्या गुह्यांत वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वाहन चोरीच्या गुह्यांना आळा घालण्याबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने परिमंडळ-7चे पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्क साईट पोलीस ठाण्यातील अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या विशेष पथकाने मोटारसायकल चोरांचा माग काढण्यास सुरुवात केली असताना मोटारसायकल चोरी प्रकरणातील काही चोरटे घाटकोपर येथील अमृत नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पार्क साईट पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुकळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने अमृत नगर भागात सापळा रचून रुपेश नागनाथ कांबळे (22), विकास विश्वास बनसोडे (18) व त्यांचा 17 वर्षीय अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. 11 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केल्यानंतर विक्रोळी, घाटकोपर, साकीनाका व पवई भागातून त्यांनी अनेक मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. तसेच त्यातील काही मोटारसायकल त्यांनी आपल्या मित्रांना दिल्याची माहिती दिली. त्यानुसार या चोरट्यांनी चोरलेल्या वाहनांपैकी 11 दुचाकी पोलिसांनी विविध ठिकाणावरून हस्तगत केल्या आहेत. यात बजाज पल्सर, होंडा युनिकॉर्न, होंडा डिओ, होंडा डिलक्स, टि.व्ही.एस, होंडा ग्रेजा, यामाहा या कंपन्यांच्या मोटारसायकलचा समावेश आहे. या मोटारसायकल चोरी प्रकरणात पार्क साईट, पंतनगर, साकीनाका व पवई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रुपेश कांबळे व विकास बनसोडे या दोघांना 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली. तसेच यातील अल्पवयीन असलेल्या मुलाला त्यांच्या पलकांच्या ताब्यात देण्यात आल्याचेही बनसोडे यांनी सांगितले.