मुंबई - संक्रांतीच्या पर्वावर राज्यात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. आज नाशिकमध्ये नॉयलॉन मांजामुळे गळा कापला गेल्यामुळे एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाने नॉयलॉन मांजावर बहिष्कार घालण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. काही महापालिका क्षेत्रात नॉयलॉन मांजा खरेदी व विक्री केल्यास दंडात्मक कारवाईही केली आहे.
प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत असल्याचे निर्दशनास आले आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार अशा व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.