मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केले होते.
आमदार अतुल भातखळकर यांना धमकीचे फोन
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्यालाही धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे. समता नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरणारे नाही, असे आव्हानच भातखळकर यांनी धमकीचे फोन करणाऱ्यांना दिले आहे.
पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे कालपासून धमक्यांचे फोन येत आहेत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांना घाबरणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे, असा इशाराच आमदार भातखळकर यांनी ट्विटरवरुन दिला आहे.
मला फोन करूनच दाखवा - नितेश राणे
पूजा चव्हाणबद्दल आवाज उठवल्यावर आमच्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन येत आहेत. एखादा कॉल मलाही टाका ना, असे खुले आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: विरोधक सत्ताधारी आमने-सामने