मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना मोठा तडाखा बसला आहे. वादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ हा तराफा बुडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर काहींचा शोध अद्याप सुरू आहे. या प्रकरणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि ओएनजीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा राजीनामा घ्या, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
अरविंद सावंत यांचे मोदींना पत्र
खासदार अरविंद सावंत यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. ओएनजीसी ही कंपनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अखत्यारित येते. राज्यात काही झालं तरी राजीनामा मागणारे भाजपा नेते प्रधान यांचा राजीनामा का मागत नाहीत, असा सवाल सावंत यांनी या पत्रातून उपस्थित केला आहे. ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही महाराष्ट्रात घडली असती तर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले असते. ओएनजीसी ही कंपनी पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येते, आणि या मंत्रालयाचे प्रमुख धर्मेंद्र प्रधान आहेत. मग भाजपा नेते त्यांचा राजीनामा का मागत नाहीत, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. या तराफ्यांना मोठा तडाखा बसला आहे, मोठी जीवितहानी देखील झाली आहे. याला जबाबदार कोण, नुकसान भरपाई कोण देणार? केवळ एकमेकांकडे बोट दाखवून चालनार नाही असं देखील त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - दिलासादायक.. लॉकडाऊनमुळे अमरावती व बुलडाण्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, तर रिकव्हरी रेट वाढला