मुंबई - राज्यभरात सध्या मशिद आणि मंदिरावरील भोंग्यांचा विषय तापला आहे. विविध शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील धार्मिद सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्नाच्या आरोपाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. जनहित याचिकेवर याचिकाकर्ता हेमंत पाटील यांनी आज तातडीने सुनावणी घेण्यात यावी, याकरिता मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या याचिकेवर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज ठाकरे यांनी पुणे, ठाणे आणि औरंगाबाद येथे सभा घेवून राष्ट्रीय नेते, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका-टिप्पणी करत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. तसेच मशिदीवरील भोंगे काढा, अन्यथा परिणाम वाईट होतील, असे चिथावणीखोर वक्तव्य करत मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे आदेश ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी, अशी मागणी पाटील मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त तसेच औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. असे असले तरी पोलिसांकडून ठाकरे यांच्याविरोधात जामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
कोण आहेत हेमंत पाटील? : हेमंत पाटील हे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष आहे. हेमंत पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. गुढी पाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळावरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत धार्मिकस्थळांवरील भोंग्याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठाणे आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी सभा घेत आपली भूमिका आक्रमतेने भाषणातून मांडली. हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर. एन. कछवे यांच्यामार्फत कोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच राज ठाकरे यांचे राजकीय दौरे, पत्रकार परिषद आणि विविध शहरात कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या दौऱ्यांवर काही काळापूरती बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - Chandrakant Patil : 'शिवसेना आपल्या जुन्या मुडमध्ये, त्यांची दादागिरी...'; चंद्रकांत पाटलांची टीका