मुंबई - हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पाऊस पडल्यावर शुक्रवारी सकाळी मुंबईमधील वातावरण काही प्रमाणात तापले होते. मात्र शुक्रवारी रात्री पुन्हा पाऊस पडल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
एका तासात इतका पाऊस - मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १० ते ११ या एका तासात मुंबई शहर विभागातील जी साऊथ विभाग येथे ३८, फ्रॉस बेरी येथे २०, भायखळा फायर स्टेशन येथे १९, एफ साऊथ वॉर्ड कार्यालय येथे १८, नायर हॉस्पिटल येथे १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात कुर्ला येथे १२, चेंबूर फायर स्टेशन येथे ६ तर पश्चिम उपनगरात दहिसर फायर स्टेशन येथे १५, आर सेंट्रल वॉर्ड येथे १२, दिंडोशी फायर स्टेशन येथे १२, बांद्रा फायर स्टेशन येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नसल्याने कुठेही पाणी साचण्याच्या घटना नोंद झालेली नाही.
तीन तासात भायखळ्यात सर्वाधिक पाऊस - मुंबई हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत रात्री ८ ते ११ या तीन तासात कुलाबा येथे ०.५ , भायखळा ३२.५, माटुंगा ०.५, सायन ५.५, चेंबूर येथे २.५, विद्याविहार १२.५, जुहू एअर पोर्ट ११.५, सांताक्रुझ ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.