मुंबई - गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू आहे. हा विषाणूचा प्रसार कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले असतानाच मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ऑक्टोबर महिन्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, चिकनगुनिया, कावीळ या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. साथीचे आजार पसरत असल्याने आरोग्य विभागापुढे चिंता वाढली आहे.
- साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले -
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनीया, लेप्टो, कावीळ हे साथीचे आजार डोकेवर काढतात. त्यात ऑक्टोबर महिन्यांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो, चिकनगुनिया, कावीळ व स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. ऑक्टोबर महिन्यांत मलेरियाचे ४८२, डेंग्यूचे २१३ तर गॅस्ट्रोचे १९३ रुग्ण तर लेप्टोचे २९, चिकनगुनियाचे ३०, कावीळचे ३० व स्वाईन फ्लूचे ६१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या जानेवारी ते आतापर्यंत १० महिन्यांत लेप्टोमुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
- आरोग्य विभागापुढे चिंता वाढली -
कोरोना विरोधात लढा देत असताना साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेता मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नॉन कोविड रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह, हेल्थ पोस्ट सज्ज ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक वॉर्डातील दोन ते तीन रुग्णालये, प्रसुतीगृह, हेल्थ पोस्ट या ठिकाणी मलेरिया, डेंग्यू, हिवताप, अतिसार, कावीळ, लेप्टो अशा विविध आजारांवर वेळीच उपचार करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. सध्या कोरोना नियंत्रणात आहे, मात्र साथीचे आजार पसरत असल्याने आरोग्य विभागापुढे चिंता वाढली आहे.
जानेवारी ते २४ ऑक्टोबरपर्यंत रुग्ण संख्या -
- मलेरिया - ४,४८५
- गॅस्ट्रो - २,३१०
- डेंग्यू - ६८९
- कावीळ - २२३
- लेप्टो - २०८
- स्वाईन फ्ल्यू - ६१
- चिकनगुनिया - ४५
हेही वाचा - ऐन दिवाळीच्या तोंडावर लाल परीच्या टिकीटात दरवाढ; सर्वसामान्याचा खिशाला लागणार कात्री!