मुंबई - बुधवार सकाळपासून मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रवाशांना घरी पोहचण्यास कोणत्याही प्रकारची खास वाहतूक व्यवस्था नसल्याने विक्रोळी बेस्ट आगाराच्या बाहेर व सर्वोदय सिग्नलवर प्रवासी थांबून बेस्ट बसची वाट पहात आहेत. प्रवाशांची एलबीएस मार्ग आणि विक्रोळी आगाराच्या बाहेर बेस्ट बस पकडण्यासाठी गर्दी होत आहे.
सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने कांजूरमार्ग, सायन, कुर्ला, माटुंगा, भांडुप, मुलुंड येथील रेल्वे ट्रकवर मोठया प्रमाणात पाणी भरले आहे. त्यामुळे लोकल जाग्यावरच थांबवण्यात आल्या होत्या. सखल भागात रस्ते वाहतूक मंदावली असल्याने रस्त्यावर रिक्षा व इतर वाहने कमी प्रमाणात चालू आहेत. प्रवाशी विक्रोळी रेल्वे स्थानकात उतरून पुढे कुर्ला, बांद्रा अंधेरी जाण्यासाठी विक्रोळी आगार समोरील एलबीएस मार्गावरील विक्रोळी आगारसमोर बेस्ट बसची वाट पाहत आहेत. तर घाटकोपर मेट्रोनी अंधेरी, सकिनाका, बांद्रा येथून आलेले प्रवाशी पुढे ठाणे, मुलुंडच्या दिशेला जाण्यासाठी सर्वोदय सिग्नलच्या जवळ बेस्ट बस अथवा खाजगी बस तरी मिळेल म्हणून रस्त्यावर मोठया संख्येने उभे आहेत.