मुंबई - टीआरपी घोटाळ्यामध्ये अटक झालेल्या पार्थो दासगुप्तांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान पार्थो यांच्यावतीनं जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात 1 जानेवारीला सुनावणी होणार आहे. पार्थो दासगुप्तांचे अर्णब गोस्वामी यांच्यासोबत घनिष्ठ संबंध असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
पार्थो दासगुप्तांच्या बँक खात्याची चौकशी
सीआययूने गेल्या आठवड्यात बनावट टीआरपी प्रकरणात ब्रॉडकास्ट प्रेक्षक संशोधन परिषद (बीएआरसी)चे सीईओ पार्थो दासगुप्ता यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने त्यांच्या बँक खात्याची देखील चौैकशी केली आहे. तसेच या प्रकरणात दासगुप्ता यांच्या काही माजी साथीदारांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दासगुप्तांनी केले विदेशी दौरे
सामान्यत: लाच रोख स्वरूपात दिली जाते आणि हिशोब ठेवला जात नाही, परंतु सीआययूने दावा केला आहे की, आरोपीने आर्थिक व्यवाहारासंबंधी व्हॉट्सऍप वरून डीलीट केलेले महत्त्वपूर्ण संभाषण फॉरेन्सिक लॅबमधून परत मिळवण्यात आले असून, त्याआधारे तपास सुरू आहे. पार्थो दासगुप्त व काही आरोपींनी परदेश दौरे केले आहेत. टीआरपीमध्ये फेरबदल करण्याच्या मोबदल्यात या दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच मुंबईतील जी हॉटेल्स येथे अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांची बैठक झाली होती. याची माहिती दासगुप्ता यांनी मुंबई क्राईम ब्रॅंचला दिली आहे.