मुंबई - पूर्व उपनगरातील काही खासगी शाळांनी कोरोनाच्या संकटातही केलेल्या फी वाढीविरोधात आज (शुक्रवार) पालकांनी मनसे नेते अमित राज ठाकरे यांची भेट घेतली. फी न भरल्यास शाळा मुलांना शाळेतून नाव नोंदणी रद्द करण्याची धमकी देत असल्याचे पालकांनी यावेळी सांगितले. यावेळी मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, अखिल चित्रे उपस्थित होते.
पूर्व उपनगरातील काही खासगी शाळांनी 2020- 21 या वर्षांतही गेल्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्के फी वाढ केली आहे. शासनाने शाळा, महाविद्यालयांना फी वाढ न करण्याचे आदेश देऊनही अनेक शाळांनी शासनाच्या आदेशाला न जुमानता केराची टोपली दाखवली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना खासगी शाळांची मनमानी सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या पालकांच्या प्रतिनिधींनी अमित ठाकरेंची भेट घेत आपली व्यथा मांडली.