मुंबई - परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोदराव बोराडे व उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांच्यासह जिल्ह्यातील २४ विद्यमान नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, एमआयएम व इतर पक्षातील नगरसेवक, रविवारी टिळक भवन येथील कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यभरातील विविध पक्षांचे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षातील अनेक नेते व पदाधिकारी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. परंतु आम्ही कोणालाही प्रलोभने दाखवून काँग्रेसमध्ये प्रवेश देत नाही. परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने इतरपक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत. परभणी जिल्हा आत काँग्रेसमय झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या पक्ष प्रवेशाने परभणी, नांदेड व औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. सरकार पाडण्याची स्वप्न दररोज पाहिली जात आहेत. पण दोन वर्षे झाली सरकार काही पडत नाही या नैराश्येने भाजपाला ग्रासले आहे. त्यातून वारंवार सरकार पडण्याच्या तारखा सांगितल्या जात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून पाच वर्ष हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या पक्षप्रवेशाने जिंतूर, सेलू व किनवट भागात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होणार आहे. काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. परभणी शहराच्या विकासासाठी ८० कोटींचा निधी दिला तर सेलुसाठी ५० कोटींचा निधी दिला. विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. उत्तर प्रदेश, पंजाबसह पाचही राज्यात काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करत असल्याचे चित्र दिसत असल्यानेच काँग्रेसवर टीका केली जात आहे. राज्यातही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवा असे आव्हान चव्हाण यांनी केले.
हेही वाचा - Jayaprabha Studio In Kolhapur : जयप्रभा स्टुडिओचा वाद चिघळला, आंदोलकांकडून खरेदीदाराच्या ऑफिसवर शाई फेक