मुंबई - मुंबई पोलीस स्कॉटलंड यार्डच्या तुलनेत जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून प्रसिद्ध असलेली मुंबई पोलीस आता वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्रातील पोलीस दलातील सध्या आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांवर दाखल असलेल्या वेगवेगळ्या फौजदारी गुन्ह्यांअंतर्गत चौकशी सुरू आहे. त्यामध्ये खंडणी, बनावट कागदपत्र, फसवणूक, फोन टॅपिंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्यात चौकशी करत आहेत. हे कदाचित पहिल्यांदाच घडले आहे. एका राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने आयपीएस अधिकाऱ्यांवर फौजदारी खटले सुरू ( Maharashtra IPS Officer Enquiry ) आहेत.
महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळचे अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती, हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, निलंबित डीसीपी सौरभ त्रीपाठी, ठाणे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, डीसीपी पराग मणेरे, डीसीपी अभिषेक त्रिमुखे, पुण्यातील डीसीपी रवींद्र पाटील या आयपीएस अधिकार्यांची चौकशी सुरू आहे. या आठ ही अधिकाऱ्यांवर कोण कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
परमबीर सिंह यांची या 5 प्रकरणात चौकशी ( Parambir Singh Case ) - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, राज्य पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांपैकी एक त्यांना मागील वर्षी डिसेंबरमध्ये निलंबित करण्यात आले होते. 2021 मध्ये त्यांच्याविरुद्ध मुंबई आणि ठाणे पोलीस ठाण्यात वेगवेगळे खंडणीचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले. यात प्राथमिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणात परमबीर सिंह काही महिन्यांपासून फरार होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये ते चौकशी करिता समोर आले. मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात गुन्हे शाखेने दाखल केलेल्या याचिकेवर परमबीर सिंह यांना गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते. गेल्या महिन्यात, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह विरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून दाखल केलेले सर्व खटले केंद्रीय अन्वेषण ब्युरो कडे वर्ग करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. बुधवार (दि.13) रोजी सीबीआयच्या प्रमाणे परमबीर सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या पाचही प्रकरणात नव्याने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
मागील वर्षी मार्चमध्ये परमबीर सिंह यांनी आरोप केला होता की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांचे वसुली मुंबईतील बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलमधून गोळा करण्यास सांगितले. त्यानंतर या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांना मागील वर्षी अटक केली होती. सध्या याच प्रकरणात तपास करत असलेल्या सीबीआयने अनिल देशमुख यांचा ताबा घेतला आहे. मात्र, अनिल देशमुख यांनी यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर, परमबीर सिंह मुंबई आणि ठाणे पोलीस उपायुक्त अकबर पठाण आणि पराग मणेरे यांच्याविरुद्ध दाखल खंडणी प्रकरणातील काही गुन्ह्यांची चौकशी सुरू आहेत. मुंबई पोलीस आयुक्त पदाची भूमिका स्वीकारण्यापूर्वी परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त होते. नंदकुमार गोपले, आशा कोरके आणि बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचीही या प्रकरणांसंदर्भात चौकशी केली जात आहे. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातील सहआरोपी संजय पुनमिया यांना अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे लिक केल्याप्रकरणी मुंबई पोलीस डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची देखील चौकशी सुरू आहे.
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण ( Rashmi Shukla Phone Tapping Case ) - कुलाबा पोलीस आणि पुणे पोलीस राज्य गुप्तचर विभागाच्या माजी संचालिका रश्मी शुक्ला यांची चौकशी करत आहेत. सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून शुक्ला कारभार पाहत आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केलेल्या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबई पुणे या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींच्या फोनवर बेकायदेशीरपणे टॅप केले आहे. त्या व्यक्तींचे फोन टॅप केल्याबद्दल महाराष्ट्रातील राजकीय आणि पोलीस अधिकारी शहर सायबर सेल पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध नोंदवलेल्या आणखी एका फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांची चौकशी सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी चौकशीला सामोरे गेल्या. रश्मी शुक्ला यांनी म्हटले आहे की, केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने प्रेरित तक्रारींवर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देवेन भारती यांच्या 'या' प्रकरणाचा तपास ( DGP Deven Bharti Case ) - महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळचे अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती हे आणखी एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहे. ज्यांच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि भारतीय पासपोर्ट कायद्याच्या कलमांप्रकरणी विविध चौकशी सुरू आहे. देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने पत्रकार जे डे हत्याकांड, 26/11 चा दहशतवादी हल्ला, शीना बोरा खून प्रकरण आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेवर कारवाई देखील केली होती. भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष हैदर आझम खान यांच्याशी विवाहित असलेल्या रेश्मा खैराती खान यांच्या विरोधात खटला न चालवण्यासाठी विशेष शाखा-I मधील एका पोलीस निरीक्षकावर दबाव आणल्याचा आरोप आयपीएस अधिकारी देवेन भारतींवर करण्यात आला. रेश्मा खैराती खानवर बोगस जन्म प्रमाणपत्राच्या मदतीने बेकायदेशीरपणे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप होता. देवेन भारती त्यावेळी मुंबई सह पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था या पदावर होते.
दरम्यान, सौरभ त्रिपाठी आणि रवींद्र पाटील या दोन अधिकारी यांच्या व्यतिरिक्त आयपीएस अधिकार्यांवर नोंदवलेले बहुतांश गुन्हे हे राजकीय सूडबुद्धीने किंवा शत्रुत्वामुळे आहेत, असे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी के जैन यांनी सांगितले. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील भांडणात पोलीस अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवले जात हे दुर्दैव आहे. एकेकाळी मुंबई पोलिस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक मानले जात होते. पण, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींच्या मालिकेमुळे दलाच्या प्रतिमेवर वाईट परिणाम झाला आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल, स्वाभिमान आणि विश्वासार्हतेवर परिणाम झाला आहे, असेही पी. के. जैन यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Chitra Wagh Notice : चित्रा वाघांच्या अडचणीत वाढ; रघुनाथ कुचिकांनी पाठवली 10 कोटींची नोटीस