मुंबई - माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीची तक्रार करणारा उद्योजक श्याम अग्रवालने आपल्या जबाबात एक मोठा गौप्य स्फोट केला आहे. मार्चमध्ये परमबीर यांचा खास आणि अग्रवाल याचा पूर्वीचा भागिदार पुनमिया यांच्यासोबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीत एक पोलीस अधिकारी म्हणत होता की, एनआयए लवकरच महाराष्ट्रातील 4 ते 5 मंत्र्यांची चौकशी करेल आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊन कोसळेल, अशी चर्चा ऐकली असल्याचे स्पष्टीकरण अग्रवाल यांनी आपल्या जबाबात दिले आहे.
मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या विरोधात उद्योजक श्याम अग्रवाल यांच्याकडून 15 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या प्रकरणी उद्योजक अग्रवाल यांचा पूर्वीचा भागिदार संजय पुनामिया (55) आणि त्याचा सहकारी सुनिल जैन(45) यांना अटक करण्यात आली. श्याम अग्रवाल यांची पुनामिया याच्या सोबतची भागिदारी 2011 मध्ये वादामुळे संपुष्टात आली. त्यानंतर पुनामियाने अग्रवाल यांच्या विरोधात खंडणी आणि फसवणूकीचे जवळपास 18 गुन्हे दाखल केले होते अशी माहिती अग्रवाल यांनी पोलिसांना दिली.
अग्रवाल यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, या वर्षी 20 आणि 23 मार्चला तडजोड करण्यासाठी मी पुनमिया यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत झालेले संभाषण अग्रवाल यांनी रेकॉर्ड करून ठेवले. त्याच्या आधारानेच त्यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि इतरांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्या बैठकीवेळी पुनमिया याला परमबीर सिंह यांच्यासह डीसीपी अकबर पठाण आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला होता.
ज्यावेळी पुनामियाला फोन आला होता, त्यावेळी ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लिहण्यात आलेल्या 100 कोटींच्या लेटर बॉम्बची चर्चा झाल्याचे मी ऐकले असल्याचे अग्रवालने पोलिसांना सांगितले. त्यावेळी चर्चेदरम्यान पुनमिया म्हणाला होता, की 100 कोटी प्रकरणात लवकरच सीबीआय चौकशी सुरू करेल. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणाकडून चार ते पाच मंत्र्यांची चौकशी होईल, ज्यामुळे सरकार अडचणीत येऊन कोसळेल, असे मी ऐकले होते, असे अग्रवाल यांनी यावेळी आपल्या जबाबात म्हटले आहे. परमबीर सिंह 17 मार्चला मुंबई पोलीस आयुक्त पदावरून पायउतार झाले. तर अनिल देशमुख यांनाही या प्रकरणात मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.