मुंबई - मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर HDIL प्रिमियर कोहिनूर, कांजूरमार्ग या रहिवाशी सोसायटीमधून आणि BMC शाळा, विक्रोळी येथून दोन लहान मुलांचे अपहरण झाल्याच्या दोन ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. याबाबत तक्रार मिळाल्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. मात्र, व्हायरल ऑडिओ क्लिप ह्या fake आहेत, अशी कुठलीही घटना घडलेली नाही, याची नागरिकांना माहिती द्यावी. त्यातून जनजागृती होईल. त्यामुळे जनतेच्या मनातील भीती कमी होईल, असे आवाहन परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.
स्थानिक रहिवाश्याकडे चौकशी - पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले, त्याअनुषंगाने आम्ही स्वतः विक्रोळी पार्कसाईट, कांजूरमार्ग व घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्फतीने खात्री केली असता अशा कोणत्याही प्रकारचे अपहरण झालेले नाही. पोलिसांनी संबंधित घटनास्थळी भेट देऊन स्थानिक रहिवाश्याकडे चौकशी केलेली आहे. त्यानुसार अशा प्रकारची कोणतीही तक्रार परिमंडळातील पोलीस ठाण्यास अद्यापपर्यंत मिळालेली नाही.
ट्युशन टीचरने क्लिप पाठवली - अंधेरी येथील कला विद्या मंदिर हायस्कूलकडून पवई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली. या तक्रारीत शाळेने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अपहरण झाले आहे, अशी ऑडिओ क्लिप आमच्या पालकांकडून आम्हाला मिळाली याचा मागोवा घेतला. त्यावेळी असे निदर्शनास आले की, आमच्या विद्यार्थ्यांच्या ट्युशन टीचरने क्लिप पाठवली आहे. त्या ट्यूशन टीचरचे नाव झीनत मुकादम आहे. आम्ही तिला शाळेत बोलावून घेतले आणि तिने घडलेल्या घटनेबाबत माफी मागितली. तसे लिहूनही दिले आहे. तिलाही संबंधित बातमी खोटी असल्याची आणि असे काही झाले नसल्याची ऑडिओ क्लिप बनवून त्याच ग्रुप वर पाठवण्यास सांगितले. आम्हीही आमच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर आणि ऑडिओ क्लिप पाठवली. तसेच शाळेत पालक सभा घेऊन ही बातमी खोटी असल्याचे आणि विद्यार्थी शाळेत सुरक्षित असल्याचे पालकांच्या निदर्शनास आणून दिले. शालेय पातळीवर योग्य ती कारवाई करण्यात आली. ही क्लिप इतकी वायरल होईल अशी शक्यता प्रथम दर्शनी लक्षात आली नाही, तरी आपण योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार कला विद्यामंदिर हायस्कूल यांनी पवई पोलीस ठाण्यात केली आहे.