मुंबई - देशात कोरोना महामारी काळात ऑक्सिजनचा तुटवडा पाहता रेल्वेने आता आपल्या रुग्णालयात स्वत:चे ऑक्सिजन प्लांट बसविण्याची योजना आखली आहे. रेल्वेने 52 ऑक्सिजन प्लांटला मंजुरी दिली असून 30 प्लांट प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर आहेत. रेल्वेची सर्व कोविड रुग्णालये प्राणवायू प्रकल्पांनी सुसज्ज होणार आहेत. सध्या राज्यात भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयात प्राणवायूची निर्मिती सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात पुणे आणि मुंबई येथील रुग्णालयातही अशी सुविधा उपलब्ध होईल.
रुग्णालयांची क्षमता वाढविणार
कोरोना विरोधातल्या लढ्यात भारतीय रेल्वेचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. एकीकडे रेल्वे, ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून देशभरातील विविध भागात ऑक्सिजन पोहचवत आहे. दुसरीकडे प्रवासी आणि मालवाहतुकीचे कर्तव्यही चोखपणे बजावत आहे. त्याचवेळी रेल्वेने आपल्या विभागाअंतर्गतच्या वैद्यकीय सुविधाही वाढवण्यावर भर दिला आहे. देशभरातील रेल्वेच्या 86 रुग्णालयांची क्षमता प्रचंड प्रमाणावर वाढवली जात आहे. या अंतर्गत, 4 प्राणवायू प्रकल्प कार्यरत आहेत. 52 प्रकल्पांना मंजूरी दिली असून 30 प्रकल्प प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर आहेत. रेल्वेची सर्व कोविड रुग्णालये प्राणवायू प्रकल्पांनी सुसज्ज होणार आहेत. प्राणवायू निर्मितीच्या प्रकल्पांबाबत 2 कोटी रुपयांपर्यंतची मंजूरी देण्याचे अधिकार महाव्यवस्थापकांना दिले आहेत. याशिवाय अनेक उपाययोजना केल्या आहेत. कोरोना उपचारासाठीच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या 2 हजार 539 वरुन 6 हजार 972 इतकी वाढवण्यात आली आहे. कोविड रुग्णालयातील आयसीयूमधील बेड्सची संख्या 273 वरुन 573 इतकी वाढवण्यात आली आहे.
मुंबई, सोलापूर आणि पुणे विभागात लवकरच
देशात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने तत्काळ आपल्या सर्व विभागातील रेल्वे हॉस्पिटल प्रशासनाला ऑक्सिजन प्लांट संदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. तसेच लवकरात लवकर प्लांट सुरू करावे, असा आदेश सर्व झोनच्या सर व्यवस्थापकांना दिले आहे. त्यामुळे याकरीता मध्य रेल्वेच्या नागपूर व मुंबई, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागाने याबाबत प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी भुसावळ विभागात ऑक्सिजन प्लांटमधून प्राणवायू निर्मिती सुरू झाली आहेत. या प्रकल्पामधून १०० बेडला २४ तास पुरेल इतका १५ दशलक्ष ऑक्सिजन २४ तासांत तयार केला जात आहे. तर पुण्याच्या रेल्वे रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे. ऑक्सिजन प्लांटसाठी जागादेखील निश्चित केली आहे. एक ते दोन आठवड्यात पुण्यातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू होईल, असे सांगितले जाते. यातून मिनिटाला २५० लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाईल. सुमारे ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
प्रत्येक झोनमध्ये दोन ते तीन प्लांट
भारतीय रेल्वेचे देशात १८ झोन आहेत. प्रत्येक झोनमध्ये दोन ते तीन ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. पुर्व मध्य रेल्वेचे पं. दीनदयाल उपाध्याय नगर येथील लोको विभागीय रुग्णालयात ४४ लाख खर्च करून ऑक्सिजन प्लांट लावण्यात येणार आहे. तर प्रयागराज येथील रेल्वे रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तयार केले जात आहे. येत्या काळात देशात असणारे मध्यवर्ती रेल्वे रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तयार करून ऑक्सिजनचा तुटवडा कमी केला जाणार आहे. मध्य रेल्वेमध्ये भुसावळ येथे प्लांट सुरू झाला आहे. तर पुण्यात देखील एक ते दोन आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि नागपूर विभागासह इतर विभागातही ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - म्यूकरमायकोसिस रूग्णांवर होणार मोफत उपचार, राज्य सरकारने कंबर कसली