मुंबई - आमदार सरदार तारासिंग आणि मुलुंड हे समीकरण इतके घट्ट आहे की, ते सोडवणे अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला जमलेले नाही. गुजराती बहुल मतदारसंघ असूनही पंजाबी असलेले तारासिंग येथून निवडून येत आहेत. मागील 20 वर्षांपासून सरदार तारासिंग मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मोठ्या संख्येने गुजराती मतदारांनी मनोज कोटक यांच्या पारड्यात मतदान केले होते. या विभागाची परिस्थिती पाहता विद्यमान आमदार वयोवृद्ध झाले. त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. या विभागातील आमदारकीचे मुख्य दावेदार समजले जाणारे कोटक खासदारकीची लॉटरी लागल्याने भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत चढाओढ सुरू झाली आहे. भाजपकडून कुणाला संधी मिळणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे
हेही वाचा - प्रतिष्ठित अशा 'आयबीसी' पुरस्कारावर 'ईटीव्ही भारत'ची मोहर!
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या मुलुंड मतदारसंघामध्ये उच्चभ्रू, मध्यम आणि गरीब अशी लोकवस्ती आहे. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय अशी चेहरेपट्टी मुलुंडला आहे. पूर्वेकडील नवघर, मिठागर, गव्हाणपाडा, निर्मलनगरपासून पश्चिमेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मुलुंड कॉलनीपर्यंत असा भाग या विधानसभा क्षेत्रात येतो. 2014 च्या निवडणुकीत तारासिंग यांना 90 हजार पेक्षा जास्त मतदान झाले होते. विकास काम न करता सिंग हे खासगी इमारतींना आमदार फंडातून पेव्हर ब्लॉक लावून देतात हा विकास आहे का?असा आरोप विरोधकांकडून होतो. मात्र, असे असताना देखील त्यांना हरवणे विरोधकांना शक्य झाले नाही. सिंग यांचे कट्टर विरोधक काँग्रेसचे चरण सिंग सप्रा या वेळी निवडणूक लढवणार नसून त्यांच्या जागी काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेत असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. सिंग यांची लढाई विरोधकांकडुन नसून त्यांची लढाई ही स्वतःच्या पक्षातील लोकांबरोबर असणार आहे.
हेही वाचा - मृत्यू म्हणजे अतिशय प्रिय असा मित्र : महात्मा गांधी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर उत्तर पूर्व मुंबईतील या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मुलुंड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक ६३.६६ टक्के मतदान भारतीय जनता पक्षाला झाले आहे. यात नवख्या कोटक यांना सव्वा लाखापेक्षा अधिक मतदान झाले. मुलुंड विधानसभा क्षेत्रात १९९९ पासून भाजपचे आमदार सरदार तारासिंग कार्यरत आहेत. मागील पालिका निवडणुकीत भाजपचे सहाच्या सहाही नगरसेवक निवडून आले होते.
तारासिंग हे वयोवृद्ध झाले असल्यामुळे त्यांच्याऐवजी नवीन नेतृत्व मिळावे यासाठी भाजप पदाधिकाऱयांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आमदारकीचे प्रबळ दावेदार कोटक खासदार झाल्याने, नगरसेवक, पदाधिकारी आमदारकीच्या तयारीला लागले आहेत. मुलुंडमधून भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे, पदाधिकारी विनोद कांबळे, पी.एस. नागराजन तसेच युवानेते विरल शहा यांची नावे उमेदवारीसाठी पुढे करणे सुरू झाले आहे.
तारासिंग मात्र कोणीही आले तरी आपणच निवडणूक लढवणार यावर ठाम आहेत. वंचितच्या उमेदवाराचा शोध अजूनही सुरू आहे. मनसे पदाधिकारी निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असले तरी कृष्णकुंजवरून हिरवा कंदील मिळण्याची वाट बघत आहेत.