मुंबई - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. गावा-गावात या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत बहुतांश निकाल हाती आले. ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण 26,718 उमेदवार बिनविरोध विजयी ठरले. तर अंतिम निवडणूक रिंगणात 2,14,880 उमेदवार उभे होते.
- ग्रामपंचायत निकालातील महत्वाचे मुद्दे -
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते विखे पाटील, राम शिंदेंसह अनेक दिग्गजांच्या गटांना फटका बसल्याचे निकालांवरुन स्पष्ट होत आहे. एकूणच निकालावरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर जनतेकडून शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे. मात्र महाराष्ट्राच्या सर्व भागात भाजपला घवघवीत यश मिळाले असल्याचा दावा पक्षप्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. तीन सत्ताधारी पक्ष एकत्र असतानाही भाजपने हे यश मिळवले. सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंड भेद वापर करून पाहिले. पण भाजपने नेत्रदीपक यश मिळवले असे उपाध्ये म्हणाले. मात्र कोल्हापूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गटाचा मूळ गावीदेखील पराभव झाला. शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांच्या गटाने इथे बाजी मारली. तर सांगली जिल्ह्यात मंत्री जयंत पाटील यांच्या सासुरवाडीत राष्ट्रवादीला दणका बसला. पाटील यांच्या मिरज तालुक्यातील सासुरवाडी म्हैसाळ ग्रामपंचायत निवडणुकीत जयंत पाटील यांचे मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या सत्ताधारी पॅनलचा पराभव झाला. गावात 17 पैकी 15 जागांवर भाजप पुरस्कृत गटाचा विजय झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या विसापूर ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीने निर्विवाद बहुमत मिळवले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मोठा झटका मानण्यात येतोय. नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालंय. त्यामुळे मी विरोधकांवर टीका करणार नाही. या निकालाचा अभ्यास त्यांनी करावा हा माझा सल्ला असेल असे मंत्री भुजबळ म्हणालेत. नागपूर ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. निकाल अंतिम टप्प्यात आले असताना जिल्ह्यात ८० टक्केपेक्षा जास्त ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे चित्र होते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वतःच्या राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का बसला आहे. लोणी खुर्द या ग्रामपंचायत निवडणुकीत 17 पैकी 13 जागा परिवर्तन पॅनलने कल भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का दिला आहे. ही ग्रामपंचायत मागील वीस वर्षापासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात होती.
- दिग्गजांना पराभवाचा धक्का -
औरंगाबाद जिल्ह्यात आदर्श गाव अशी ओळख असलेल्या पाटोदा गावाच्या राजकारणात भूकंप झाल्याचे दिसले. तीस वर्षे पाटोद्याच्या ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा निवडणुकीत धुव्वा उडाला. त्यांच्या मुलीलाही या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे राज्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथील ग्रामपंचायतीचा निकाल लागला. सरपंच पोपटराव पवार यांच्या ग्रामविकास पॅनेलने सातही जागा तिथे जिंकल्या. गेल्या तीस वर्षामध्ये हिवरेबाजारमध्ये निवडणूक झाली नव्हती. बिनविरोध झालेल्या निवडणुकीत पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली गावातील एकूण कारभार राहिला होता. गावामध्ये केलेल्या विकासकामांमुळे हिवरेबाजार आणि पोपटराव पवार यांचे नाव आदराने घेतले जाते. यंदा, मात्र गावातील एक शिक्षक किशोर साबळे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ग्रामविकास परिवर्तन पॅनल स्थापन करून ७ उमेदवार त्यांनी उभे केल्याने निवडणूक झाली. मात्र ते सर्वजण पराभूत झाले.
- तृतीयपंथीने मिळवला ऐतिहासिक विजयप्रतिनिधींना तृतीयपंथी अंजली पाटील (गुरू संजना जान) यांच्यासोबत साधलेला संवाद
जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीत एका तृतीयपंथीने ऐतिहासिक विजय मिळवला. अंजली पाटील (गुरू संजना जान) असे विजयी झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. अंजली पाटील हिची उमेदवारी आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाकारली होती. मतदार यादीत त्यांच्या नावापुढे इतर असा उल्लेख असल्याने त्यांना महिला प्रवर्गातून उमेदवारी नाकारली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांची उमेदवारी वैध ठरवली होती. त्यामुळे त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
- कोकणात राणेंचे वर्चस्व
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री भाजप नेते नारायण राणे यांचे वर्चस्व दिसून आले. भाजपकडे 45 ग्रामपंचायती तर सेनेकडे 21 ग्रामपंचायती आल्यात. राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायती राखल्या आहेत. मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडीमध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. रायगड जिल्ह्यात शेकापचे वर्चस्व निकालामध्ये दिसून आले.
नंदुरबार तालुक्यातील भाडवड ग्रामपंचायत निवडणुकीत दोन उमेदवारांना सारखी 222 मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून विजय घोषित करण्यात आला. नवापूर तालुक्यामध्येही असेच घडल्याने चिठ्ठी टाकून उमेदवार निवड झाली. अहमदनगर जिल्ह्यात भाजप नेते राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपच्या पॅनलचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ पैकी ७ जागा जिंकून सत्ता परिवर्तन केले.
संध्याकाळपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणे बाकी आहे. रात्री उशिरा सगळे निकाल हाती आल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
हेही वाचा - राष्ट्रवादीची सत्ता नसलेल्या ग्रामपंचायतीसाठीही प्रामाणिकपणे निधी आणला जाईल - रोहित पवार
हेही वाचा - तृतीयपंथी अंजलीची 'रिक्षा' सुसाट; ग्रामपंचायतवर झेंडा फडकवणारी पहिली तृतीयपंथी
- विदेशात शिक्षण घेणारे ते ग्रामपंचायत सदस्यकल्याणकुमार नयन
राजकारणात उच्च शिक्षित लोकांनी यावं असा एक मतप्रवाह आहे. मात्र, असे चित्र क्वचितच दिसून येते. मात्र, या अपेक्षेला सार्थ करून दाखवले ते कल्याणकुमार नयन यांनी. दिल्लीच्या जेएनयूचे विद्यार्थी, विदेशात उच्च शिक्षण, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आणि आता ते चितेगाव ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य ठरले आहेत. त्यांच्या या प्रवासाने राजकारणातील अपेक्षेला एक वेगळी दिशा मिळाली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे ते पती आहेत.