मुंबई - मुंबईमधील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे असताना मुंबईच्या भायखळा आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ आश्रमातील तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यात १५ लहान मुले असल्याचे समोर आले आहे. या मुलांवर पालिकेच्या नायर रुग्णालय आणि भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रूडास कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
२२ जण कोरोना पॉझिटिव्ह -
मुंबईत आग्रीपाडा येथे सेंट जोसेफ अनाथ आश्रम आहे. या अनाथ आश्रममध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्याने, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरादरम्यान आश्रमामधील काम करणारे कर्मचारी आणि मुलांची अशा एकूण ९५ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामधील २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १२ वर्षाखालील ४ मुलांवर पालिकेच्या नायर रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. तर, इतर १२ वर्षावरील ११ मुलांना तसेच ७ कर्मचाऱ्यांना भायखळा येथील रिचर्डसन आणि क्रूडास कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
७ लाख ४२ हजार नागरिकांना कोरोना -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी ११ मार्चला पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आजपर्यंत गेल्या दीड वर्षात ७ लाख ४२ हजार ४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७ लाख २० हजार ७५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १५ हजार ९५० रुग्णांचा कोरोनामुळे झाला आहे. सध्या मुंबईत २ हजार ८५५ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १८८४ दिवस इतका आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्ण आढळून आलेल्या २६ इमारती सील करण्यात आल्या असल्याची माहितीही पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.