मुंबई - एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात आरोप - प्रत्यारोपाचे रंगलेले नाट्य संपता संपत नाही आहे. समीर वानखेडे प्रकरणी दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं मलिकांविरोधात ७ दिवसांत FIR दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. यावर बोलताना भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी आता मुंबई पोलिस नवाब मलिक यांच्यावर एफआयआर दाखल करते का? हे बघणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
मुंबई पोलीस नवाब मलिकांना अटक करणार का? मोहित कंबोज
समीर वानखेडे प्रकरणी दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं मलिकांविरोधात ७ दिवसांत FIR दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. अॅट्रोसिटी प्रकरणी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलीस कधी मंत्री नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करणार? आणि हा अदखलपात्र गुन्हा असल्याने त्यांना अटक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय संविधानाचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी दिली आहे.
मालिकांच्या अडचणीत वाढ?
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वादाचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आता आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना पुढील ७ दिवसांत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडे यांनी आयोगासमोर म्हटलं होतं की, नवाब मलिकांनी त्यांच्यावर मानसिक अत्याचार केलेत. वानखेडे यापूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये होते. तेव्हा मलिकांच्या जावायाला ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. जावई जेलमधून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी वानखेडेंच्या जाती आणि धर्माबद्दल प्रश्न विचारत संशयाचं वातावरण तयार केले. समीर वानखेडे मुस्लीम आहेत, असे मलिकांचा आरोप होता. वानखेडेंनी बनावट महार जातीचे प्रमाणपत्र बनवले. त्याचआधारे त्यांना नोकरी बळकावली असं मलिकांनी म्हटले होते.