मुंबई - धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली असून वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी मुंबई पोलीस आणि तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. या पत्राची दखल लोकसभा सचिवालयाने घेतली असून यासंदर्भातील अहवाल २४ तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. ( om birla response on MP Navneet Rana letter )
राणा यांच्या पत्राची लोकसभा सचिवालयाकडून दखल - खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. त्यात नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, मला खार पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. पोलिसांनी रात्रभर पाणी न दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लिहिले की, 'मला 23 एप्रिल 2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. तसेच मला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे. यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला. खार पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये माझ्यावर जी वागणूक दिली जाते. ती जनावरांवर जी वागणूक दिली जाते त्यापेक्षा वाईट होती.' असे राणा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या पत्राची दखल आता लोकसभा सचिवालयाने घेतली असून यासंदर्भातील अहवाल २४ तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहे.