मुंबई - राज्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दुचाकींची संख्या वाढली आहे. दुचाकींची संख्या वाढण्यासाेबतच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी हेल्मेटसक्तीविरोधात बोलणाऱ्या नेत्यांमुळे वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सर्व प्रश्नचिन्हांना पूर्णविराम देत हेल्मेट सक्ती कायद्यात असून त्याला कोणताही पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. हेल्मेटचा वापर वाढावा म्हणून शासकीय कार्यालयांपासून ( Government Offices ) कारवाई सुरू करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
कायद्याहून कुणीही मोठे नाही - केंद्र व राज्य शासनाने हेल्मेट सक्तीचा नियम रद्द केलेला नाही. परिणामी, राज्यात कुठेही हेल्मेटशिवाय दुचाकी चालवता येणार नाही. तसा प्रयत्नही चालकांनी करू नयेत. रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेटअभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. रस्ते सुरक्षा समितीच्या माहितीनुसार, दुचाकींचे सर्वाधिक अपघात हे अंतर्गत रस्त्यांवर झाले आहेत. तसेच हेल्मेट परिधान केल्यामुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटल्याचे वारंवार समोर आले आहे. म्हणूनच राज्यात अंतर्गत रस्त्यांवर हेल्मेट वापरण्याची गरज नाही ? असे कोण्ही बोलू नयेत. देशात हेल्मेट सक्तीचा कायदा आहे. कायद्याहून कुणीही मोठे नाही. त्यामुळे प्रत्येकाने या नियमाचे पालन करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
विनाहेल्मेटची कारवाई तीव्र - शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांपासून हेल्मेटचा वापर वाढावा म्हणून शासकीय कार्यालयांबाहेर विनाहेल्मेट फिरणाऱ्या दुचाकीस्वारावर ( Without Helmet Drive ) कारवाईचे आदेश दिले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांकडे व पोलिसांकडे बोट दाखवत सर्वसामान्य चालक हेल्मेट वापरण्यास नकार देत आहेत. मात्र, ही पद्धत चुकीची आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांबाहेर गस्ती पथकांना विनाहेल्मेटची कारवाई तीव्र करण्यास सांगितल्याची माहितीही अविनाश ढाकणे यांनी दिली आहेत.
दोन वर्षात तीन हजारपेक्षा जास्त मृत्यू - गेल्या काही वर्षांत दुचाकीस्वारांचे अपघात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हे अपघात कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी अनेकदा हेल्मेटसक्ती केली होती. याशिवाय दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली. तरीही आज अनेक वाहनचालक वाहन चालवत असताना हेल्मेट परिधान करत नाही. यापूर्वी 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' सारखे अभियान वाहतूक पोलिसांकडून चालविण्यात आले होते. विशेष म्हणजे हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांना परवाना रद्दही करण्यात आलेला आहे. तरीही दुचाकी वाहनांचे अपघात कमी झाले नाही. 2019 आणि 2020 मध्ये राज्यात झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट न घातल्याने तीन हजार 156 सहप्रवाशांना मृत्यूला सामाेरे जावे लागले आहे.
हेही वाचा - Video : पोलिसांना चकमा देत न्यायालयातून आरोपी पळाला; शिताफीने पकडून केली अटक