मुंबई - कोरोना महामारीचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. मागील 18 महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यभरातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत आम्ही जगायचे कसे, असा सवाल कलावंत करत आहेत. नवरात्र उत्सव सुरू आहे. या दिवसांमध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांना खूप मागणी असते. मात्र, यंदा राज्य सरकारने गरबाला परवानगी न दिल्यामुळे या कलाकारांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आलेली आहे. यामुळे येणारी दिवाळी कशी घालवायची? असा प्रश्न या कलाकारांचे समोर उभा राहिला. याबाबत 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट.
कलाकारांमध्ये प्रचंड नाराजी -
सरकारने नवरात्रातील रासगरबा, दांडियांचे आयोजन रद्द केल्याने यानिर्णयावर दांडियाप्रेमींसह यासाठी वस्त्र पुरवणारे व्यवसायिक, विद्युत रोषणाई, डीजे वाद्यवृंद, कलावंत, गायक गरबा नृत्य प्रशिक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कारण या उत्सवात करोडोची उलाढाल होते. मात्र यावर्षी गरबा कार्यक्रमांचे आयोजन होणार नसल्यामुळे मोठे नुकसान या कलाकारांचे झाले आहे. राज्य सरकारने लक्ष येणाऱ्या काळात तरी सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली पाहिजे, अशी या कलाकार आणि व्यावसायिकांची मागणी आहे.
'...तरच आम्हाला मानधन मिळते' -
ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनमध्ये मराठी, हिंदी वाद्यवृंदात १२ हजारांपेक्षा अधिक कलाकार आहेत. यामध्ये गायक – गायिका, वादक, निवेदक, नर्तक, कव्वाल, लोकशाहीर, गोंधळी, मिमिक्री आर्टीस्ट, लाईट–साऊंट तंत्रज्ञ आणि निर्माते, बॅकस्टेज कामगार आपली कला पेश करुन आपले आणि आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात. तसेच ते शासकीय कार्यक्रम, पोलीस वेल्फेअर, सिनेमा अशा विविध कार्यक्रमात आपली कला सादर करतात. मात्र सध्या लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी कार्यक्रमाना परवानगी देण्यात आली नाही. ही कला घरात बसून आपल्या आदेशाप्रमाणे सादर करता न येणारी कला असून जेव्हा आम्ही आमची प्रत्यक्ष कला ज्याठिकाणी सादर करतो, त्याचवेळी आम्हाला आमचे मानधन मिळते. त्यावरचे आमच्या कुटुंबाची गुजराण होत असते, असे अजय रणधीर यांनी सांगितले.
'आम्ही दिवाळी कशी साजरी करायची' -
गेल्या वीस वर्षांपासून मी या क्षेत्रात आहे. मागील दोन वर्षापासून आम्हा कलाकारांवर हलाखीचे दिवस आले आहे. या वर्षी तरी सर्व काही आणि चांगली परिस्थिती आहे. यामुळे परवानगी गरबाला दिली पाहिजे होती. महामारी आहे, मान्य आहे. पण प्रश्न पोटाचा पण आहे. काम नाही केले तर खाणार काय, असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. आता दिवाळी कशी साजरा करायची, असा प्रश्न आता कलाकार विचारत आहेत.
'कचऱ्याच्या भावामध्ये वस्तू विकाव्या लागतील' -
नवरात्र उत्सवामध्ये साऊंड सिस्टिमला ही मोठी मागणी असते. डीजे असे अनेक उपकरणं या उत्सवात वापरली जातात. करोडोंची उलाढाल होते. नऊ दिवस रोजगार प्राप्त होतो. मात्र, यावेळी कोणतेही कार्यक्रम नसल्यामुळे साऊंड व्यावसायिकांवदेखील उपासमारीची वेळ आली आहे. दोन-तीन वर्षे होत आली आहे, काम नाही. साहित्य धूळ खात पडले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू चालवले नाही तर त्यांना मेंटेनन्स करावा लागतो. खिशातले पैसे टाकावे लागतात. जर का एखादी मशीन किंवा मिक्सर बंद पडला तर फक्त सर्विसिंग चार चार ते पाच हजार रुपये आहे. हा खर्च न परवडणारा आहे आणि असंच जर चालू राहिलं तर कचऱ्याच्या भावामध्ये भंगारमध्ये आम्हाला या वस्तू विकावे लागतील. सरकारकडे हीच विनंती आहे की, तुम्ही लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढून आमच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवावा, असे साऊंड व्यवसायिक राजेश वाघमारे यांनी सांगितले.
'...पण तो मार्ग आम्हाला अवलंबवयाचा नाही' -
दीड वर्षापासून हा सगळा कालखंड सुरू आहे. गेली तीस-पस्तीस वर्षे आम्ही काम करतो, परंतु एवढी वाईट परिस्थिती पहिली नाही. जी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली त्यांनी जो मार्ग अवलंबतो तो मार्ग आम्हाला अवलंबवयाचा नाही. परंतु जर परिस्थिती राहिली तर कदाचित त्या दिशेने एक पाऊल पडण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी कार्यक्रम झाला नाही, गेल्या वर्षी दिवाळी दसराही आम्ही साजरा केला नाही, अशी प्रतिक्रिया निवेदक-कलाकार अशोक निकाळजे यांनी दिली.
हेही वाचा - जागतिक मानसिक आरोग्य दिन : मानसिक आरोग्यात झोपेला अधिक महत्व;...अशी घ्या शांत झोप