मुंबई - भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये दोन महिला फुटपाथवरील गटाराचे झाकण तुटल्याने पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यामुळे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील मॅनहोलची तातडीने आणि नव्याने तपासणी करण्याचे सक्त निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
नेमके काय झाले होते -
भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये दोन महिला फुटपाथवरील गटाराचे झाकण तुटल्याने पडल्याची प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी पडलेल्या पावसामध्ये भांडुप विलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यातून दोन महिला रस्ता शोधत होत्या. त्यावेळी अचानक या महिला एकामागोमाग एक गटारात पडल्या. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह कमी होता. नाही तर या दोन्ही महिलांच्या जीवावर बेतले असते. भांडुप मध्येच दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक महिला मॅन हॉलमध्ये पडून मृत्यूमुखी पडली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
काँग्रेसकडून कारवाईची मागणी -
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मीडिया आणि सोशल मीडियामध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यानंतर पालिकेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. हा निव्वळ निष्काळजीपणा आहे. हे मॅनहोल कोणी उघडले, ते बंद का करण्यात आले नाहीत याची चौकशी करून याला जे कोणी दोषी असतील त्यांच्यवर कारवाई करावी अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केले आहे.
बीएमसी कुंभकर्णाच्या झोपेत, भाजपाची टीका -
भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, पालिकेत २० वर्षाहून अधिक काळ शिवसेनेचे राज्य आहे. राज्यातही शिवसेनेचे सत्ता आहे. पालिकेचे ४० हजार कोटींचे बजेट असून ५८ हजार कोटींच्या बँकेत ठेवी आहे. तरीही मुंबईकर असुरक्षित आहेत. लोक मॅनहोलमध्ये वाहून जात आहेत. येत्या निवडणुकीत मुंबईकर त्यांना आपली जागा दाखवून देतील असे म्हटले आहे. तर ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी बीएमसी कुंभकर्णाच्या झोपेतून जागी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. डॉ. अमरापूरकरांच्या घटनेनंतरही बीएमसीने धडा घेतला नाही. बीएमसी कोणत्याही मोठ्या अपघातांची वाट पहात आहे का. किती काळ लोकांच्या आयुष्याशी खेळणार असे प्रश्न उपस्थित केले आहेत. बीएमसीने मॅनहोलचा मुद्दा गांभीर्याने घ्यायला हवा. या महिलांचे प्राण वाचले ही आनंदाची बाब आहे. मात्र, दुःखाची बाब म्हणजे अद्याप पालिकेचे अजूनही दुर्लक्ष आहे, असे कोटक यांनी म्हटले आहे.
पालिकेकडून दखल -
भांडुप येथील मॅनहोलमध्ये दोन महिला पडल्याची घटना माध्यमांनी दाखवल्यावर पालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील मॅनहोलची तातडीने आणि नव्याने तपासणी करण्याचे सक्त निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक दोन दिवसात आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मॅनहोलबाबतही चर्चा केली जाईल असे सांगितले.