मुंबई - कर्नाटकमध्ये बहुमताचे सरकार आपल्या सत्ता, पेसा आणि दमदाटीच्या बळावर आज भाजपने पाडले. त्यातून त्यांनी लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून देशाची लोकशाही धोक्यात आणली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये बहुमताचे सरकार होते. बहुमतासाठी असणारे आकडेही सरकारकडे होते. मात्र, भाजपने दमबाजी, अमिषे आणि पैशाची लालच दाखवून आमच्या आणि इतर पक्षाच्या आमदारांना मुंबईत आणून ठेवले. त्यांना आम्हाला भेटू दिले नाही. रुग्णालयातही आमदार आले असताना त्यांनाही भेटू दिले नाही. त्यामुळे भाजपने गोव्यात आणि आता कर्नाटकमध्येही आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला. असा प्रकार काँग्रेसने कधीही केला नाही. त्यामुळे भाजपने हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. की, आज दिन तुम्हारे है, कल हमारे भी, आ सकते है, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
भाजपच्या धोरणामुळे देश भविष्यात हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे या देशात लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम होत आहे. त्यामुळे आता देशातील जनतेनेच सावध होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.