मुंबई - किरीट सोमैया यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी केंद्रीय गृहसचिव ( Union Home Secretary ) यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कायदा व सुवेवस्था संदर्भात जी परिस्थितीत निर्माण झाली आहे, त्याबाबत तसेच भाजपा नेते किरीट सोमैया व मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी फडणवीसांनी हे पत्र लिहिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांना लिहिलेल्या पत्रात सोमैयांवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर पोलिसांना पूर्वसूचना देऊन किरीट सोमैया त्यांना भेटण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांचा मोठा जमाव पोलीस ठाण्याबाहेर आला व त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी तेथील गर्दी दूर करावी, असे सोमैया यांनी पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. तर त्याचा परिणाम असा झाला की सोमैया यांच्या गाडीवर दगडफेक, बाटल्या फेकून मारण्यात आले. पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना गंभीर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या आडुन गुंडगिरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. किरीट सोमैया यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा देण्यात आली आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र मुंबई पोलीस याबाबत गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. देशातील सक्षम पोलीस दल असलेले मुंबई पोलीस महाविकास आघाडी सरकारचे नोकर असल्यासारखे वागत आहे, असा गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी सोमैयांवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेतली नसून हा प्रकार हल्ल्याचे समर्थन करण्यासारखा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. राजकीय दबावामुळे हे सर्व होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - नवनीत राणांना तुरुंगात आयोग्य वागणूक, महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलं - देवेंद्र फडणवीस