मुंबई - राज्यातील जिल्हा परिषदांच्या निकालानंतर भाजपची काही जिल्हा परिषदांमधून सत्ता गेली. तरिही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला असल्याचे म्हटले आहे. तसेच फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. या सरकारचं वागणं म्हणजे दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून ह्यांचेच पेढे वाटणे सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
हेही वाचा... 'केंद्रातील भाजप सरकारची स्थिती कंगाल आणि दारूड्यासारखी'
राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष...
जिल्हा परिषदांचे निकाल जाहिर झाले. यात भाजपचा पराभव झाल्याचा प्रचार सर्व पक्ष करत आहेत. मात्र, 2012 साली या सर्व जिल्हा परिषदांमध्ये आमच्या एकूण 52 जागा होत्या. आता त्या 106 झाल्या आहेत. याचाच अर्थ भाजपच्या जागा वाढल्या आहेत. तसेच एकूण निकाल राज्यात जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष देखील भाजप ठरला आहे. याचाच अर्थ जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद आमच्या सोबत असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपूरमध्ये फक्त पिछेहाट झाली आहे....
भारतीय जनता पक्षाचे होम ग्राउंड असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेतून भाजपची सत्ता गेली आहे. फडणवीस यांनी मात्र, हा दारूण पराभव नाही, तर फक्त पिछेहाट असल्याचे म्हटले आहे. गेल्यावेळी नागपूर परिषदेत भाजपला 21 जागा होत्या आणि शिवसेनेला 8 जागा होत्या. आता आम्हाला 15 जागा आहेत आणि शिवसेनेला 6 जागा. याचा अर्थ आमची फक्त पिछेहाट झाली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी - गृहमंत्री अनिल देशमुख
मनसे बाबत भविष्यात विचार होईल...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबत आणि भाजप-मनसे युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, सध्या असं काहीच सुरू नसल्याचे म्हटले आहे. मनसे आणि भाजप यांच्या एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मनसेची कार्यपद्धती आणि विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे मनसेने आपली कार्यपद्धती बदलली, तर भविष्यात तसा विचार होऊ शकतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुलगा दुसऱ्याच्या घरी झाला आणि पेढे हे वाटतायत...
महाविकास आघाडीतील पक्ष यांच्यात समन्वय नाही. भाजपची पिछेहाट झाल्याचा प्रचार या आघाडीतील तिन्ही पक्षांकडून होत आहे. मात्र, या तिन्ही पक्षांची स्थिती म्हणजे, 'दुसऱ्याच्या घरी मुलगा झालाय आणि हेच पेढे वाटत आहेत' अशी झाल्याचे बोलत,फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि त्यातील पक्षांना टोला लगावला आहे.
हेही वाचा... गांधी शांती यात्रेला मुंबईतून सुरुवात; सहाहून अधिक राज्यातून जाणार यात्रा