मुंबई - काँग्रेसची अवस्था जमीन नसलेल्या जमीनदार सारखी झाली आहे. जमीनदाराकडे मोठी शेती होती, हवेली होती. मात्र लँड सिलिंगचा कायदा आला आणि जमीनदाराच्या हातातले सर्व गेले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीतून काँग्रेसला लगावला. शरद पवारांनी केलेल्या या वर्णनात विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवत सध्याच्या काँग्रेसचे करेक्ट वर्णन शरद पवार यांनी केले, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला काढला. तसेच काँग्रेसची मालगुजारी गेली आता, उरलेल्या मालावर काँग्रेसचे गुजरान चालू आहे, असा टोलाही फडणीस यांनी काँग्रेसला लगावला आहे. आज (शुक्रवारी) मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा समर्थन करत काँग्रेसला टोला लगावला.
'सरकार मदिरालय उघडू शकतात, तर मंदिर खुली का करत नाही?'
मंदिरावर लाखो लोकांची उपजीविका आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे मंदिर बंद असल्याने या सर्व लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा, म्हणूनच भारतीय जनता पक्ष मंदिर खुली करण्याची मागणी करत आहे. निर्बंध लावून मदिरालय उघडण्यास राज्य सरकार परवानगी देते. मग तसेच निर्बंध लावून मंदिर खुली करण्यास परवानगी का देत नाही? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केला आहे.
'गणेशोत्सवावर निर्बंध असतानाही 144 कलम लावण्याची गरज काय?'
राज्य सरकारने लावून दिलेल्या निर्बंधानुसारच गणेशोत्सव साजरा केला जातो. राज्यभरातील गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारचे नियम पाळत बाप्पाची मूर्ती तसेच मंडप बांधले आहेत. तसेच मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. मात्र मुंबईतही गणेशोत्सव साजरा करत असताना, राज्य सरकारचे निर्बंध पाळले जात आहेत. तरीही राज्य सरकारने 144 कलम का लागू करून दबंगगिरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हेही वाचा - भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन - अण्णा हजारे