मुंबई - ग्रामपंचायतच्या निवडणुका पक्ष चिन्हावर होत नाहीत, त्यामुळे अमुक पक्ष पहिला अमुक पक्ष दुसरा असे होत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे. राज्यात कालच काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा (Ajit Pawar Statement on Gram Panchayat Election Results) निकाल लागला. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. गावाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्यांनी चांगलं काम करावे, असा सल्लाही दिला. अजित पवारांनी विविध मुद्यावरही भाष्य केले.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा कोणाचा होणार ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दसरा मेळावा घेण्यासाठी बीकेसी येथील मैदानात परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात परवानगी मिळावी. अजूनही काही दिवस उद्धव ठाकरे यांनी मैदान मिळावे यासाठी प्रयत्न करावे. नाहीतर न्यायालयाच्या माध्यमातून परवानगी आणावी. याआधीही दसरा मेळाव्यासाठी न्यायालयातून परवानगी आणल्या गेल्या आहेत, असा सल्ला विधानसभाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे दोन्ही दसरा मेळावे (Opposition Leader Ajit Pawar Statement) व्हावेत.
जनतेला दोन्हीही विचार ऐकण्यास मिळावे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावामध्येच उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी देण्याची घोषणा केली होती. तसेच आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचा उल्लेख करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात, यात काही गैर नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
दसरा मेळावा हा शिवसेनेचा पक्षीय कार्यक्रम - प्रत्येक पक्षाचा पक्ष कार्यक्रम असतो. त्याचप्रमाणे दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमात इतर पक्षाचे कोणीही जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मेळाव्याला कोणीही जाणार नाही. मात्र महाविकास आघाडी म्हणून एखादी सभा किंवा कार्यक्रम घेण्यात आला तर, या कार्यक्रमासाठी किंवा सभेसाठी तीनही पक्षाचे नेते एकाच मंचावर दिसतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट (Gram Panchayat Election Results 2022) केले.
राजकीय जीवनात व्यक्तिगत टीका करू नये - नुकतेच शिंदे गटात सामील झालेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी रत्नागिरीत भाषणादरम्यान आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका टीपणी केली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत अशा प्रकारची वक्तव्य बसत नाहीत. राजकीय आयुष्यात राजकीय टीका टिपणी नक्की करावी. मात्र वैयक्तिक टीका कोणीही करू नये. राज्यातील जनतेला देखील अशा प्रकारची वक्तव्य आवडत नाहीत. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही असा टोला रामदास कदम यांना अजित पवार यांनी लगावला आहे.
राणे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार - नारायण राणे यांचा जुहू येथील बंगल्यामधील अवैध बांधकामात तोडीबाबत उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना दहा लाखाचा दंड ठोठावला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नारायण राणे यांना न्यायालयाचा हा निर्णय योग्य वाटला नाही तर, सर्वोच्च न्यायालयात ते या विरोधात अपील करू शकतील. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र यासंदर्भात नारायण राणे यांना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा आदर हा राखलाच पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी या प्रकरणात नारायण राणे यांना दिला आहे.