मुंबई - राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात ( budget session begins ) झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. या दरम्यान विरोधकांनी हातात नवाब मलिक व दाऊद इब्राहिम यांचे पोस्टर पकडले होते. यासंदर्भात मंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधकांचा समाचार ( Yashomati Thakur On Opposition ) घेताना नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही ( Yashomati Thakur About Nawab Malik ) असं सांगितलं आहे.
मलिकांचा राजीनामा पूर्वग्रहित -
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधक आक्रमक होतील याबाबत कुठलीही शंका नव्हती. त्याप्रमाणे आज अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधक पायऱ्यांवर जमा झाले व त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर महा विकास आघाडी सरकार नवाब मलिक यांना त् पाठीशी घालत असल्याकारणाने आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
राजीनामा मागण्याचा अधिकार नाही -
या संदर्भात बोलताना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले आहेत. उत्तर प्रदेशात केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारले. पण त्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आला नाही. दुसरीकडे इकबाल मिर्ची याच्यासोबत काही नेत्यांनी संबंध ठेवले. पण त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. विरोधकांना मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा कुठलाच अधिकार नाही. हातातून सत्ता निसटली या कारणाने ते बेचैन झालेले आहेत. सत्तेसाठी हपापलेले आहेत. म्हणून या पद्धतीने राजीनामा मागत आहेत असा आरोपही मंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधकांवर लगावला.
राज्यपालांनी घटनेचा अवमान करू नये -
दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, राज्यपाल हे घटनेचे रक्षक असतात, यांनी घटनेचा अवमान होईल असे कोणतेही काम करायला नको, त्यांनी विधिमंडळात अभिभाषण करायला हवे होते. त्यांनी कोणत्या कारणाने अभिभाषण केले नाही ते त्यांनाच विचारावे लागेल असे मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा - Devendra Fadnavis : मागासवर्गीयांचा डाटा न्यायालयाने नाकारल्याने सरकारची नाचक्की झाली - देवेंद्र फडणवीस