मुंबई - मुलुंडमधील एका मॉलमध्ये सरकत्या जिन्यामध्ये अडकून दीड वर्षाच्या चिमुकल्याला उजव्या हाताची तीन बोटे गमवावी लागली आहेत. आर-मॉलमध्ये चिन्मय राजिवडे हा चिमुकला पालकांसह खरेदीसाठी गेला होता. खरेदी झाल्यानंतर हे तिघे सरकत्या जिन्यावरून खाली उतरले.
परंतु आईवडिलांच्या नकळत चिन्मय पुन्हा पायऱ्यांकडे वळला; आणि त्याने जिना चढण्याचा प्रयत्न केला.मात्र तो खाली पडल्याने जिन्याच्या पॅसेजमध्ये त्यांची बोटे अडकली. आरडाओरडा केल्याने त्याचा हात काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तोपर्यंत चिन्मयच्या हाताची तीन बोटे तुटली होती. यानंतर त्याला फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. काही वेळात चिन्मयला पुढील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु चिन्मयच्या हातांच्या शीरा दबल्याने बोटे पुन्हा जोडता आली नाहीत.
नियमानुसार सरकत्या जिन्यांना सेन्सर्स असणे तसेच या पायऱ्यांजवळ अटेंडंट असणे आवश्यक असते. यासंदर्भात प्रशासनाकडून नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. परंतु बऱ्याच मॉलमध्ये यासंदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नाही. तसेच मेंटेनन्स देखील वेळेत होत नसल्याने या प्रकारच्या घटनांमध्ये अपघातग्रस्तांची संख्या वाढत आहे.
काही दिवसांपूर्वी अंधेरी रेल्वे स्थानकातील सरकता जिना उलट्या दिशेने फिरल्यामुळे काही प्रवासी एकमेकांवर कोसळले होते. यासंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.