मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवरीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरण मोहिमेंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी डोस देण्याचा टप्पा आज १० नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ९२ लाख ०४ हजार ९५० (९९ टक्के) नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ५८ लाख ६२ हजार ९३३ (६३ टक्के) नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१ कोटी ५० लाखांचा टप्पा ओलांडला -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या दोन लाटा आल्या असून कोरोनाचा प्रसार आटोक्यात आहे. कोरोनाचा प्रसार रोखता यावा म्हणून १६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमे दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे दोन्ही डोस मिळून कोविड लसीकरण करावयाचे आहे. या उद्दिष्टापैकी आज (दिनांक १० नोव्हेंबर २०२१) सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ९२ लाख ०४ हजार ९५० म्हणजेच ९९ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ५८ लाख ६२ हजार ९३३ (६३ टक्के) नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांचा यामध्ये समावेश आहे.
लसीकरणाचे टप्पे -
मुंबईसह देशभरात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्या-टप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचारऱ्यांसाठी ५ फेब्रुवारी; ६० वर्ष वयावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी १ मार्च; ४५ वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी १ एप्रिल; १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी दिनांक १ मे पासून लसीकरण सुरु करण्यात आले. याच प्रमाणे परदेशी जाणारे विद्यार्थी, खेळाडू, स्थनदा माता, गर्भवती महिला, घरात बेडवर खिळून असलेले नागरिक, दिव्यांग व्यक्ती, सरकारी ओळखपत्र नसलेले नागरिक आदींचे लसीकरण केले जात आहे.
या दिवशी सर्वाधिक लसीकरण -
१६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरण सुरु केल्यानंतर ५ मे २०२१ रोजीपर्यंत २५ लाख मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आला. त्यानंतर २६ जून रोजी ५० लाख, ७ ऑगस्ट रोजी ७५ लाख, ४ सप्टेंबर रोजी १ कोटी, २८ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी २५ लाख आणि आज १० नोव्हेंबर रोजी १ कोटी ५० लाख लसीचे डोस देण्याचा टप्पा गाठला आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच्या लसीकरणाचा विचार करता पहिली व दोन्ही मात्रा मिळून १ कोटी ५० लाख ६७ हजार ८८३ मात्रा देण्यात आल्या आहेत.