मुंबई- सध्या एका बाटलीबंद पाणी कंपनीची जाहिरात समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून शिक्षकांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप होत असून, याविरोधात शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने जाहिरात प्राधिकरणाकडे तसेच संबंधित कंपनीकडे तक्रार दाखल केली आहे.
जाहिरातीतून शिक्षकांची खिल्ली उडवल्याचा आरोप
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे महाराष्ट्र प्रांत महासचिव प्रा. डॉ. वैभव नरवडे यांनी या जाहिरातीवर हरकत घेतली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून शिक्षकांची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले या जाहिरातीमुळे शिक्षकांचा अपमान होत असून, याविरोधात आम्ही जाहिरात प्राधिकरणाला निवेदन दिले आहे. संबंधित कंपनीने ही जाहिरात लवकरात लवकर मागे घ्यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.
शिक्षक संघटनांकडून आंदोलनाचा इशारा
शिक्षक हे समाजाला दिशा दाखवण्याचे काम करतात, कोरोना सारख्या कठीण काळात देखील आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत, मात्र अशा काही कंपन्यांच्या जाहिरातीमुळे आमची बदनामी होत आहे. या कंपनीने जाहिरात मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी नरवडे यांनी दिला आहे.
हेही वाचा - 18 ते 44 वयोगटातील लसीकरणात गुजरातला झुकते माप; जयराम रमेश यांचा आरोप