मुंबई - डिसेंबरपासून कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमालीचा खाली आला होता. त्यामुळे साहजिकच मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या कमी झाली होती, सेंटरवरचा रुग्णभार कमी झाला होता. मात्र आता मागील 15 दिवसांपासून रुग्णांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार सर्वच कोविड सेंटरमध्ये दुप्पट वा त्यापेक्षा जास्त रुग्णवाढ झाली असून कोविड सेंटरचा भार पुन्हा वाढला आहे. ही रुग्ण वाढ मुंबईची चिंता वाढवणारी असल्याचे म्हणत तज्ज्ञांनी कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन यानिमित्ताने केले आहे.
कोविड सेंटरमध्येच उपचार
मार्चपासून कोविडचा कहर सुरू झाला तेव्हा काही सरकारी-पालिका हॉस्पिटल कोविड सेंटर केले. मात्र एप्रिल-मे मध्ये बेड आणि सुविधा कमी पडू लागल्या. त्यामुळे सरकारने कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बीकेसीत एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)च्या माध्यमातून पहिले जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. पुढे नेस्को, वरळी, मुलुंड, दहिसर असे कोविड सेंटर वाढवण्यात आले. या सेंटरची कोरोना रुग्णवाढीत मोठी मदत झाली. डिसेंबरमध्ये रुग्ण संख्या कमी झाल्याने कोविड सेंटरचा भार कमी झाला. दरम्यान सरकारने नॉन कोविड रुग्णांना ही उपचार देणे गरजेचे आहे असे म्हणत कोविड हॉस्पिटल नॉन कोविड करत त्यातील कोविड बेडस तात्पुरते कमी केले. तर कोरोना रुग्णांवर कोविड सेंटर मध्ये उपचार देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर मोठ्या संख्येने कोविड सेंटरमध्येच उपचारासाठी दाखल केले जात आहे. असे असले तरी मुळात रुग्ण संख्या कमी असल्याने बऱ्याच पैकी भार कमी होता. दरम्यान कोविड सेंटरमध्येच उपचार देण्याच्या निर्णयाच्या दृष्टीने मुंबईतले कोविड सेंटर 31 मार्चपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर डॉक्टर-नर्स-कर्मचारी ही कमी करण्यात आले नाहीत. त्याचा फायदा आता रुग्णवाढ झाली असताना दिसत आहे. कारण आजच्या घडीला कोरोना रुग्णांना प्रधान्याने कोविड सेंटरमध्येच दाखल केले जात आहे.
'या' सेंटरमध्ये 'इतके' रुग्ण
कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल केले जात आहे. त्यामुळे आज मुंबईतील सर्वच्या सर्व कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या वाढली आहे. बीकेसी कोविड सेंटरची क्षमता अंदाजे 2000 बेड्सची असताना येथे 15 दिवसापूर्वी 150 ते 200 च्या आसपास रुग्ण असायचे. तर आयसीयूमध्ये 10-12 रुग्ण. पण मागील 15 दिवसापासून रुग्ण वाढू लागले आहेत. त्यानुसार आजच्याघडीला येथे 350 तर आयसीयूमध्ये 42 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ राजेश डेरे, अधिष्ठाता, बीकेसी कोविड सेंटर यांनी दिली आहे. तर वरळी जम्बो सेंटरची क्षमता 510 अशी असून येथे 15 दिवसांपूर्वी 30 ते 35 रुग्ण दाखल असायचे. पण आता मात्र हा आकडा तीन ते चार पटीहुन अधिक वाढला आहे. येथे आज 195 रुग्ण उपचार घेत असल्याचे वरळी कोविड सेंटरमधील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्याचवेळी साधारणतः 1600 बेडसची क्षमता असलेल्या मुलुंड कोविड सेंटरमध्ये आठवड्याभरापूर्वी 120 ते 130 रूग्ण असायचे. पण आता मात्र ही रुग्ण संख्या 250 वर गेल्याची माहिती डॉ प्रवीण आंग्रे, अधिष्ठाता, मुलुंड कोविड सेंटर यांनी दिली आहे. मुंबईत कोरोनाचा कहर वाढत आहे. रुग्णांना बरे करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, करत राहू. पण आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोनाला स्वतः पासून दूर ठेवण्यासाठी कोरोना नियम पाळावे, असे आवाहन डॉ डेरे यांनी केले आहे.