मुंबई - बुली बाई अॅपमध्ये ( Bully Bai App Case ) मुंबई सायबर पोलिसांकडून अजून 3 आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. आता या प्रकरणात एकूण सहा आरोपी झाले असून यापूर्वी 3 जणांना विविध राज्यातून अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून पोलीस चौकशी दरम्यान यातीन आरोपींचे नाव समोर आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई सायबर पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. दिल्लीहून नीरज बिष्णोई, ओंकारेश्वर ठाकूरला तर ओडिशाहून नीरज सिंगला अटक केली आहे. नीरज सिंगला ट्रान्झिट रिमांडवर आज शुक्रवारी रोजी मुंबईत आणले जाणार आहे.
नीरज सिंहदेखील 'या' टोळीतील एक सदस्य -
नीरज बिष्णोई हा अॅपचा निर्माता असून ओंकारेश्वर ठाकूरने अॅपसाठी कोडिंगचे काम केले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. तर त्या दोघांनी मुस्लिम महिलांचे काही फोटो आणि वैयक्तिक माहिती गोळा करून ती सोशल मीडियावर अपलोड केली होती. नीरज हा जपानी गेमचे नाव वापरून तो स्वतःची ओळख लपवत होता. त्याला ओंकारेश्वरने अॅपच्या निर्मितीची आयडिया दिली होती अशी माहिती सूत्रांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी विशालची चौकशी केली. त्याच्या चौकशीत नीरज सिंहचे नाव समोर आले. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक ओडिशा येथे गेले. तेथून नीरज सिंहला पोलिसांनी अटक केली. नीरजचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले असून तो बिष्णोईच्या संपर्कात होता. नीरज सिंहदेखील या टोळीतील एक सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींची संख्या सहावर -
नीरज बिष्णोई आणि ओंकारेश्वर ठाकूर हे दोघे मुख्य सूत्रधार असून सुली डील्स आणि बुली बाई अॅपमध्ये कोडिंगचे काम ओंकारेश्वर ठाकूरने तर अॅपनिर्मितीचे काम नीरज बिष्णोईने केल्याचे तपासात समोर आले आहे. त्या तिघांच्या अटकेने आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. मुस्लिम समाजातील महिलांची बदनामीप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून बंगळुरू येथून विशाल झा तर उत्तराखंड येथून श्वेता सिंग, मयांक रावतला अटक केली होती. त्या तिघांच्या अटकेदरम्यान दिल्ली पोलिसांनी अॅपचा निर्माता नीरज बिष्णोईला अटक केली. नीरजच्या चौकशी ओंकारेश्वरचे नाव समोर आले. त्यालादेखील दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. ते दोघे दिल्ली पोलिसांच्या कोठडीत होते. त्या दोघांच्या कोठडीसाठी सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला गेले. तेथून पोलिसांनी नीरज आणि ओंकारेश्वरला अटक करून सोमवारी मुंबईत आणले. त्या दोघांना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. त्या दोघांना न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तिघे सध्या न्यायालयीन कोठडीत -
बुली बाई अॅप प्रकरणात न्यायालयाने विशाल झा, श्वेता सिंह आणि मयांक रावतचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्या तिघांना जामिनासाठी सत्र न्यायालयात जावे लागणार आहे. बुली बाई प्रकरणात अटक केलेले ते तिघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या तिघांच्या जामिनासाठी त्याच्या वकिलांनी अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी झाली. त्यानंतर सरकारी वकिलांनी त्या तिघांच्या जामिनाला विरोध केला. ते तिघे उच्च शिक्षित असून जामिनावर सुटका झाल्यावर ते पुरावे नष्ट करू शकतात असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर बांद्रा न्यायालयाने त्या तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
कोण आहे नीरज?
नीरज बिष्णोई असे या मुख्य आरोपीचे पूर्ण नाव असून तो 20 वर्षाचा आहे. आसामच्या जोरहाटमधील दिगंबर भागातील तो रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर भोपाळमधील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो बीटेकचे शिक्षण घेत आहे.
कोण आहे विशाल?
मुंबई पोलिसांनी बुल्ली बाई प्रकरणी बंगळुरूवरून विशाल कुमार नावाच्या आरोपीला अटक केली होती. विशाल कुमार हा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. विशाल बुल्ली बाई अॅपवर महिलांचे फोटो एडीट करायचा आणि त्यानंतर ते फोटो अॅपवर अपलोड करत होता, अशी माहिती आहे. विशालनेच श्वेता सिंहच्या नावाचा खुलासा केला होता. त्यानंतर श्वेताला अटक करण्यात आली.
श्वेता सिंह आहे तरी कोण?
श्वेता सिंग ही 18 वर्षीय तरुणी उत्तराखंडची रहिवासी असून 12 वी पास आहे. सोशल मीडियावर मुस्लीम महिलांना बदनाम करण्याचे काम केल्याने मुंबई पोलिसांनी श्वेता सिंहला उधमसिंह नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून तिची चौकशी सुरू आहे. श्वेताच्या आई आणि वडिल दोघांचे निधन झाले आहे. तीन बहिणी आणि एक भाऊ, असे तीचे कुटुंब असून ते आर्थिक संकटात सापडलेले आहे. तिच्या मनात मुस्लिमांबद्दल इतका द्वेष का निर्माण झाला, की तिने पैशांसाठी हे काम केले, याचा तपास पोलीस करत आहेत. उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या श्वेताला मुंबईत आणलं जाणार आहे.
कोण आहे शुभम रावत?
श्वेता सिंहकडून शुभम रावत बद्दल माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शुभमला उत्तराखंडमधून अटक केली आहे. शुभम रावत हा दिल्लीतील एका महाविद्यालयात शिकत होता. त्याला कोटद्वारच्या निमुचौड परिसरातून अटक करण्यात आली आहे.
काय आहे बुली बाई अॅप?
बुली बाई ( Bulli Bai App ) या अॅपवर हजारो मुस्लिम महिलांचा लिलाव केला जात होता. कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. बुली बाई अॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट असल्याचा आरोप आहे. अॅपची माहिती समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. या अॅपमुळे मुस्लिमांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
हेही वाचा - Club House App : क्लब हाऊस अॅपप्रकरणी तीन आरोपींना अटक; मुंबई पोलिसांची कारवाई