मुंबई - दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी बेस्ट बसमधून प्रवास करतात. पावसाळा सुरू झाला, तरी मुंबईतील बहुतांश बस थांबे हे शेडविना मोडकळीस आले आहेत. याबाबतचा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा खास आमच्या वाचकांसाठी.
बाराही महिने लाखो मुंबईकर हे बेस्ट बसने प्रवास करतात. ऊन असो पाऊस असो प्रवासी बेस्ट बसची प्रतिक्षा करत बस थांब्यावर उभे असतात. मात्र, पावसाळ्यात त्यांना थांब्यावर भिजण्यापासून वाचवण्यासाठी साधे छप्पर देखील नीट उपलब्ध नसल्याचे दिसून आले. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने जोगेश्वरी, अंधेरी पूर्व परिसर तसेच गोरेगाव एस. व्ही. रोड परिसरात पाहणी केली असता बस थांबे शेडविना दिसून आले. अनेक थांबे व शेड हे मोडकळीस आलेले व जीर्ण झाल्याचे दिसून आले.
याबाबत बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांच्याकडे विचारणा केली असता, सदर बेस्ट थांबे हे देखरेखीसाठी जाहीरातदार एजन्सीला दिले जातात. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेले अडीच महिने जाहिरात नाही. त्यामुळे त्यांची देखभाल झाली नाही. आता संबंधित एजन्सीला सांगून त्यांची दुरुस्ती तातडीने करून घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.