मुंबई : शहरात गेल्या दीड ते दोन महिन्यात पुन्हा मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई शहरात, थिएटर आणि मॉलमध्ये प्रवेश करताना अँटीजन कोरोना चाचणी करावी लागणार आहे. अँटीजन कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच मुंबई शहरात, थिएटर आणि मॉलमध्ये प्रवेश दिला जावा असा निर्णय महापालिकेने घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सर्वाधिक रुग्णांची नोंद..
मुंबईत गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. कोरोनाचा प्रसार झाल्याने लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्यावर सर्व व्यवहार टप्प्याटप्याने सुरू करण्यात आले. त्यामुळे गर्दी होऊन पुन्हा फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गुरुवारी गेल्या वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात आज (17 मार्च) 2,877 रुग्ण आढळून आले आहेत. याआधी मुंबईत गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला 2,848 तर 8 ऑक्टोबरला 2,823 रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत आज सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
चाचणी सक्तीची..
मुंबईत वर्षभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने पालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. थिएटर, मॉलमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे. त्यासाठी कोरोनाबाबतच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. मॉल, थिएटरमध्ये प्रवेश करताना कोरोना अँटीजन टेस्ट करावी लागणार आहे. तसेच मुंबई बाहेरून मेल एक्स्प्रेसमधून येणाऱ्या प्रवाशांनाही अँटीजन टेस्ट करावी लागणार आहे. टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच मुंबई शहर, मॉल आणि थिएटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल त्यांना घरी किंवा पालिकेच्या क्वारेंटाईन सेंटरमध्ये विलगिकरण करण्यात येईल अशी माहिती काकाणी यांनी दिली.
हेही वाचा : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक; एकट्या नागपुरात 23 जणांचा मृत्यू