मुंबई - एकीकडे कोकणातील नाणार प्रकल्पाला कोकणवासीयांचा विरोध असताना दुसरीकडे मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्प हा राज्यात राबवावा, असं पत्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. पत्रात राज ठाकरे यांनी लिहिले आहे, की राज्य सध्या आर्थिक संकटात आहे. हे आर्थिक संकट दूर करायचं असेल आणि लोकांना रोजगाराची एक नवीन संधी प्राप्त करायचे असेल तर नाणार हा प्रकल्प महत्त्वकांक्षी आहे. त्यामुळे हा प्रकल्प राज्यात राबवावा यासाठीचे हे पत्र राज ठाकरे यांनी लिहिले आहे. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांच्या या निर्णयाचं आमच्याकडून स्वागत आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितलं.
भाजपचे कोकणचे आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज ठाकरे यांची नाणार वरती जी आपली भूमिका मांडलेली आहे. ती अत्यंत योग्य आहे आणि तीच भूमिका भाजपची पूर्वीपासूनची आहे. परंतु शिवसेनेचे काही नेते हे टक्केवारीच्या भानगडीत आहेत. एक गट हा टक्केवारीच्या विरोधातला आहे आणि एक गट हा टक्केवारी घेण्याबद्दल आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये आपापसात ही भांडणं चालू आहेत. त्यामुळे शिवसेना यात गुंतलेली आहे. शिवसेना या टक्केवारीचा आकडा फुगवण्यासाठी हे सगळं काही रचत आहे, असा आरोप नितेश राणे यांनी शिवसेनेवर केलेला आहे.
हे ही वाचा - महाराष्ट्र अर्थसंकल्प : 'राज्याच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार'
शिवसेना कोकणातील लोकांना फसवत आहे -
शिवसेनाही कोकणातील जनसामान्यांचा आदर करणारे निर्णय सध्या घेत नाही. नाणारच्या विरोधातली भूमिका ही शिवसेना घेते. परंतु त्यांच्याच पक्षातले राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नाणारच्या समर्थनार्थ भूमिका मांडलेली आहे. त्यांचे स्थानिक खासदार विनायक राऊत मात्र हे नाणारच्या विरोधातली भूमिका मांडत आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये नेमकं काय चालू आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि शिवसेना कोकणातल्या लोकांना फसवण्याचे काम करत आहे का, हा मोठा प्रश्न मला पडत आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं.
हे ही वाचा - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करण्याकरिता एटीएसचे पथक हिरेन यांचा घरी दाखल