मुंबई - अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या पकरणात आज(3 सप्टेंबर) एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने हे आरोपपत्र विशेष एनआयए न्यायालयात सादर केले आहे. या प्रकरणात सचिन वाझे, सुनील माने, निलंबित पोलीस अधिकारी रियाजुद्दीन काझी अटकेत आहेत. तसेच प्रदीप शर्मालासुद्धा अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 8 आरोपींना अटक केली असून, हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
- आतापर्यंतचा घटनाक्रम -
25 फेब्रुवारी रोजी एक स्कॉर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर आढळून आली होती. या गाडीत जिलेटिनच्या कांड्या होत्या. याप्रकरणात सुरुवातीला एनआयएने सचिन वाझेला अटक केली होती. काही दिवसांनी ठाणे जिल्ह्यातल्या रेतीबंदर येथे मनसुख हिरेन याचा मृतदेह आढळून आला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची लिंक अँटिलिया स्फोटकं प्रकरणाशी जुळली. कारण जी गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडली ती गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन हा सचिन वाझेचा मित्र होता.
- आतापर्यंतची कारवाई -
ख्वाजा युनूस प्रकरणात 2004 मध्ये सचिन वाझे याच्यावर पोलीस खात्याकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास 17 वर्षांनी सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात सामील करून घेण्यात आले होते. मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी यांचादेखील संबंध या प्रकरणाशी आला. त्यांनाही एनआयएकडून अटक करण्यात आली. सुनील माने आणि रियाजुद्दीन काझी अशी या दोघांची नावे आहेत. तसेच विनायक शिंदे नावाच्या एका पोलीस कॉन्स्टेबलला देखील अटक करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे विनायक शिंदे हा लखन भैया एन्काऊंटर प्रकरणातला आरोपी आहे. तो पॅरोलवर बाहेर होता. विनायक शिंदे हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याच्या जवळचा मानला जातो.
हेही वाचा - पाच फोन कॉल, हिरेन- वाझे भेट अन दहा मिनिटांची चर्चा; एनआयएच्या हाती महत्वाचा पुरावा