मुंबई - संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या 6 हजार निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यालय, आगारात चकरा माराव्या लागत आहे. मात्र, आतापर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाही. परिणामी गेल्या अडीच वर्षात 38 निवृत्त कामगारांचा मृत्यूही झालेला आहे. अशी माहिती एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.
कामगारांमध्ये संतापाची लाट
एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जाते. मात्र, 2019 पासून राज्यभरातील तब्बल 6 हजार निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 150 कोटी रुपये देणे थकीत आहे. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात गेल्या दोन वर्षापासून चकरा मारत आहे. असे एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
'अधिकाऱ्यांना रक्कम कशी मिळाली?'
सेवानिवृत्त झालेल्या 6 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे संपूर्ण थकित असलेले पैसे तात्काळ देण्याची मागणी कामगार संघटनेकडून करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांना रक्कम कशी मिळाली? आशिया खंडातील सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामध्ये एसटी महामंडळ गणली जाते. तरीही 2019 पासून 6 हजार कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरक मिळालेला नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मुंबई येथील मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सदरची रक्कम मिळालेली आहे. मात्र, आगारात काम करून निवृत्त झालेल्या चालक-वाहक यांत्रिक कर्मचारी यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे सरसकट सर्व कामगारांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह देण्याची मागणी महाराष्ट्र, एस. टी. कर्मचारी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहेत.
'निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत देणी तात्काळ व्याजासह मिळावी'
एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी तात्काळ व्याजासह मिळावी यासाठी आम्ही एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा आम्ही करत आहे. मात्र, आज निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. उतरत्या वयात त्यांना विविध आजाराच्या उपचाराकरिता निवृत्त वेतनाचा फायदा होतो. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून निवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले गेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने तात्काळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत पैसे देण्यात यावे अशी मागणी, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे केली आहेत.
हेही वाचा - 'सुरक्षेच्या आडून पूनावालांची हेरगिरी केली जातेय'